भाडेकरू महिलेवर घरमालकाकडून बलात्कार, दिली पतीला मारण्याची धमकी

अनिल कांबळे
Thursday, 8 October 2020

पीडित महिला रिया (बदललेले नाव) (वय २६) पतीसह नितीन टुले याच्या घरी भाड्याने  राहत होती. तिचा पती मिस्त्री काम करतो. त्यामुळे तो अनेकदा रात्रीसुद्धा कामावर जातो. गेल्या दीड वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले असून ती गृहिणी आहे.

नागपूर  ः घरमालकाने २६ वर्षीय भाडेकरू महिलेच्या घरातील लाईट बंद करीत तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना हुडकेश्‍वर परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी घरमालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. नितीन गंगाधर टुले (४०, पवनपुत्रनगर) असे आरोपी घरमालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रिया (बदललेले नाव) (वय २६) पतीसह नितीन टुले याच्या घरी भाड्याने  राहत होती. तिचा पती मिस्त्री काम करतो. त्यामुळे तो अनेकदा रात्रीसुद्धा कामावर जातो. गेल्या दीड वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले असून ती गृहिणी आहे. घरमालक असलेल्या नितीन टुले कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर दोन हत्यकांडाचे गुन्हे दाखल आहेत. तो यापूर्वी कारागृहातही राहून आला आहे. 

जाणून घ्या - हृदयद्रावक...रात्री सव्वा अकरा वाजता मायलेकींनी रेल्वे रुळावर झोपून संपविली जीवनयात्रा
 

त्याची भाडेकरू असलेल्या रियावर नजर गेली. गेल्या काही दिवसांपासून तो तिच्याशी बळजबरी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु, रिया त्याला दाद देत नव्हती. पती घरी नसताना रियाच्या घरात येत होता. पाणी मागण्याचा बहाणा करीत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. गेल्या २३ ऑक्टोबरला रात्री तिचा पती घरी नव्हता. ती संधी साधून आरोपी नितीनने रियाच्या घरातील लाईट बंद केले. 

तिच्या घराचे दार वाजवले. तिने दार उघडताच तिला चाकू दाखवला. तिला धमकी दिली आणि गप्प बसण्यास सांगितले. भीतीपोटी ती गप्प बसली. तो घरात शिरला आणि तिला शारीरिक संबंधाची मागणी करू लागला. तिने नकार देताच त्याने थेट तिच्या गळ्याला चाकू लावला. त्यानंतर तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. याप्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अटकही केली आहे. सध्या आरोपी मध्यवर्ती कारागृहात आहे.
 

पतीला जीवे मारण्याची धमकी

आरोपी नितीन कुख्यात गुंड असल्याची माहिती रियाला होती. शारीरिक संबंधाबाबत पतीला सांगितल्यास त्याला ठार करेल, अशी त्याने धमकी दिली. त्यामुळे तिने पतीला काहीही सांगितले नाही. थेट घर खाली करण्याचा निर्णय तिने पतीला सांगितला. त्याचे कारण विचारले असता ती सांगत नव्हती. शेवटी पतीने घर खाली करण्यास नकार दिला. त्यानंतर नितीनने रात्री केलेल्या बलात्काराबाबत पतीला माहिती दिली. 

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homeowner Torture a woman complaint to the police