भुकेवर कशी चालवावी "रापी'? त्यांच्यापुढे भीषण सवाल

file photo
file photo
Updated on

 नागपूर : रणरणते ऊन असो की धो-धा पडणारा पाऊस. डांबरी रस्त्यावर जात असताना चप्पल किंवा चपलेचा अंगठा तुटला की, आपली नजर बिनचेहऱ्याचा चप्पल शिवणारा कुठे बसला आहे, त्याचा शोध घेते. तुटलेली चप्पल शिवण्यासाठी "गटई कामगार' लिहिलेले जेमतेम एक माणूस बसेल, असे शेड दिसते. शेड नसेल तर पहाटेचा सूर्य डोक्‍यावर आल्यापासून तर सूर्यास्तापर्यंत वृक्षाच्या सावलीत बसून तुटलेल्या चपला आणि बुटपॉलिशसाठी ग्राहकांची प्रतीक्षा करणे हाच प्रवास त्यांच्या अंगवळणी पडलेला आहे. मात्र, कोरोनाचा उद्रेक शहरात सुरू झाला आणि लॉकडाउनच्या या काळात उपराजधानीच्या रस्त्यावरील वृक्षाच्या सावलीत दिसणारा गटई कामगार महिनाभरापासून हरवला आहे. जगण्याचा आणि जगवण्याचा आधार असलेली "रापी' त्याने हातात धरली नाही. ती घरात अडगळीत पडून आहे. ही "रापी' थांबली आणि कुटुंबाची उपासमार सुरू झाली आहे. 

जग वेगाने बदलू लागले आहे. आधुनिक जगात चंद्रावर माणूस पोहोचला. परंतु, हातावर पोट असणारे अजूनही लाचार अन्‌ गरिबीच्या जिन्यातून मुक्त होऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यात कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाउनमुळे भूक भागवायची कशी, हा प्रश्‍न चर्मकार समाजातील गटई कामगारांसमोर उभा ठाकला आहे. नागपुरात दोन हजारांवर गटई कामगारांची नोंदणी आहे. अवघ्या 250 गटई कामगारांना शेड मिळाले आहे. उर्वरित आरी, वेगवेगळे धागे, सुया घेऊन वृक्षाच्या सावलीत छत्रीखाली बसून सांज भागवण्यासाठी चप्पलवर शस्त्रक्रिया करीत दिसतात. 

कुशन कारागिरांवर आले संकट 
चर्मकार समाजातील गटई कामगारांना पाहिजे तसे काम मिळत नसल्याने या समाजातील अनेक तरुणांनी कुशन व्यवसाय, बॅग तयार करण्यापासून तर सोफासेटवरचे कव्हर शिवण्याचे काम सुरू केले. मात्र, कोरोनाच्या विषाणूमुळे सुरू झालेल्या या लॉकडाउनमुळे कुशन कारागिरांवर संकट आले आहे. कुटुंबाचा गाढा कसा ओढायचा, हाच प्रश्‍न उभा ठाकला आहे. उसनवारीवरचे जगणे किती दिवस सुरू असेल? सध्या चर्मचारी समाजातील दोन ते अडीच हजार युवक कुशन कारागीर म्हणून काम करीत आहेत. पूर्वी रापी होती; परंतु आता या रापीवर अनेक स्थलांतरितांनी अतिक्रमण केले. यामुळे चर्मकार समाजातील युवकांनी वीतभर पोटासाठी हातातील रापी सोडून दिली आणि परिस्थितीच्या रेट्यामुळे कुशन कारागीर बनले. परंतु, कोरोनामुळे या व्यवसायावर संकट आले. 

गटई कामगारांना त्यांच्या कामाचे योग्य मोल मिळत नसल्याने ते हे काम सोडून कुशन कारागीर बनले. परंतु, कोरोनामुळे शहरातील गटई तसेच कुशन कारागीर व त्यांच्या कुटुंबासमोर जगण्याचा बिकट प्रश्‍न उभा ठाकला आहे. रापी चालवताना ती सरकली की बोट रक्तबंबाळ होते; परंतु सांज भागते. मात्र, महिनाभरापासून गटई कामगार असो की कुशन कारागीर, घरात आहेत. यामुळे यांचे जगणे कठीण झाले आहे. यांना पाच हजार रुपये मदत करण्यात यावी. 
-मीना भागवतकर, अध्यक्ष, उत्कर्ष फाउंडेशन, नागपूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com