महापालिकेवर तिरंगा कसा फडकणार? नुसते संकल्प करून भागणार नाही

How the tricolor will fly on the Nagpur Municipal Corporation Political news
How the tricolor will fly on the Nagpur Municipal Corporation Political news
Updated on

नागपूर : विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीने काँग्रेसला थोडीफार उभारी मिळाली आहे. मात्र, अद्यापही स्थानिक पातळीवर केवळ कुरघोड्या आणि गटबाजीत नेते व्यस्त आहेत. त्यामुळे कितीही संकल्प केले तरी आगामी महापालिकेच्या निवडणुकीत तिरंगा कसा फडकणार याचेही नियोजन करण्याची गरज आहे. फक्त वॉर्डनिहाय निवडणूक हीच एकमेव आशा काँग्रेसकडे आहे.

नागपूर महापालिकेवर सुमारे पंधरा वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. पहिली दहा वर्षे अपक्षांचा टेकू घेऊन भाजपने कारभार रेटला. मात्र, मागील निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरशः पानिपत झाले. राष्ट्रीय पक्षाचे फक्त २८ नगरसेवक निवडून आले तर दुसरीकडे भाजपला भव्यदिव्य यश मिळाले. त्यांचे तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले. या दरम्यान झालेली विधानसभेच्या निवडणुकीत शहरात दोन आमदार विजयी ठरल्याने काँग्रेसला जीवदान मिळाले.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेससह आघाडी एकजूट झाल्याने अभिजित वंजारी निवडून आले. मात्र, महापालिकेची निवडणूक वेगळी असते. पक्षासोबत उमेदवारही येथे महत्त्वाचा असतो. १५० उमेदवारांना तिकीट वाटणे, मित्रपक्षांचे मन राखणे आणि काही जातीय समिकरणेही विचारात घ्यावी लागतात.

नागपूरमध्ये निश्चितच काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला जागा सोडताना काँग्रेसने नेहमीच आखडता हात घेतल्याचा इतिहास आहे. महाआघाडी कायम राहिल्यास शिवसेनेलाही जागा सोडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ‘सिटिंग-गेटिंग’चा फॉर्म्युला लागू पडणार नाही. शिवसेनेचा काही विशिष्ट भागातच जास्त जोर आहे. त्यातही त्यांना दक्षिण नागपूरमध्येच अधिक स्वारस्य आहे.

भाजप पाठोपाठ येथे काँग्रेसही मजबूत आहे. राष्ट्रवादीची ताकद तुकड्या तुकड्यांमध्ये आहे. उमेदवाराच्या भरोशावरच ते जिंकू शकतात. मतविभाजन टळल्यास राष्ट्रवादीचेही काही उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, हे बोलायला जितके सोपे आहे तेवढेच नियोजन करणे अवघड आहे. रिंगणातील उमेदवार कुणाचेही ऐकण्यास तयार नसतो. काही नेत्यांचीही त्याला फूस असते. पाडापाडीत तिसराच उमेदवार निवडून येतो.

कार्यकर्ते विखुरलेले

मागील निवडणुकीत नेत्यांच्या भांडणात काँग्रेसचे कार्यकर्ते उद्ध्वस्थ झाले. निवडणुकीच्या पूर्वीपासून सुरू झालेली गटबाजी चार वर्षे उलटून गेल्यावरही संपलेली नाही. कालच महापौरपदाच्या निवडणुकीतही काँग्रेसचे दोन्ही गटाने आपआपले उमेदवार उतरवले आहे. आमदार विकास ठाकरे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे समर्थकांची फौज आहे. दुसरीकडे विरोधकांची संख्या तेवढीच आहे. त्यामुळे कार्यकर्ते विखुरलेले आहेत.

भाजपकडे आदेश मानणार कार्यकर्ता

वॉर्डनिहाय निवडणूक झाली तरच स्वबळावर गठ्ठा मते आणि पक्षाची उमेदवारी दिमतीला असेल तरच काँग्रेस, राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येऊ शकतो. दुसरीकडे भाजप नियोजनात मजबूत आहे. त्यांच्याकडे कुरघोडी आणि पाडापाडीचे प्रकार तुलनेत फारच कमी आहे. आदेश मानणार कार्यकर्ता आहे. ही भाजपची जमेची बाजू आहे. 

काँग्रेसचे दुखणे

  • गटातटात विखुरलेले कार्यकर्ते
  • नियोजन व रणनीतीचा अभाव
  • पक्षापेक्षा नेत्यांचाच प्रभाव जास्त
  • महाआघाडी झाल्यास जागा वाटपाचा प्रश्न

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com