esakal | आंतरराष्ट्रीय शेफ डे : नववीत असताना घडलेल्या एका प्रसंगानं विष्णू मनोहर बनले प्रसिद्ध शेफ
sakal

बोलून बातमी शोधा

how Vishnu Manohar became a famous chef

विष्णू मनोहर यांनी अनेक विक्रम रचले. त्यामध्ये विविध भाज्या, पराठे यांचा समावेश आहे. तसेच रुमाली रोटी, लंबी रोटी हे पदार्थ बनविणारी त्यांची पहिली कंपनी आहे. आतापर्यंत त्यांनी खाद्यपदार्थांविषयी ५२ पुस्तके लिहिली आहेत.

आंतरराष्ट्रीय शेफ डे : नववीत असताना घडलेल्या एका प्रसंगानं विष्णू मनोहर बनले प्रसिद्ध शेफ

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर - खवय्यांची आवड पूर्ण करणारे शेफ म्हणजे विष्णू मनोहर. त्यांनी सर्वात मोठा पराठा बनविण्याचा विक्रम केला आहे. तसेच ५३ तास अविरत स्वयंपाक करूनही त्यांनी विश्वविक्रम नोंदविला आहे. पण, ते एक प्रसिद्ध शेफ कसे बनले? असा प्रश्न नक्कीच पडतो. आज आंतरराष्ट्रीय शेफ दिनाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून या प्रश्नाचे उत्तर जाणून घेतले.

नववीत असताना घडला होता प्रसंग -
विष्णू मनोहर हे लहानपणापासूनच खवय्ये होते. तसेच त्यांचे वडील चित्रकार होते. त्यामध्ये विष्णू देखील वडिलांना मदत करायचे. थर्माकॉलचे लेटर्स कापून देणे, ते चिटकविण्यासाठी वडिलांसोबत लग्नामध्ये जाणे, असे सर्व काम विष्णू मनोहर करायचे. लग्नात गेल्यानंतर होस्ट जेवून जाण्यासाठी विनंती करायचे आणि तेच विष्णू मनोहर यांना आवडत होते. कारण खाण्याची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. ते वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत वडिलांना मदत करत होते. ते नववीमध्ये असताना एक प्रसंग घडला. लग्नामध्ये जेवताना एक कॅटरींगवाला वाईट शब्दामध्ये विष्णू मनोहरांना बोलला. त्यावेळी 'मी एक दिवस यशस्वी आणि प्रसिद्ध शेफ होऊन दाखवेन', असे विष्णू यांनी त्या कॅटरिंगवाल्याला म्हटले आणि त्या कार्यक्रमामधून निघून गेले. ते जिद्दीने पेटून उठले होते. मात्र, लहान असल्यामुळे कोणी कॅटरिंगचे काम देईना. अशातच ते दहावीमध्ये असताना त्यांना कॅटरिंगचे काम मिळाले. मात्र, या वयात मुलाने शिक्षणाकडे लक्ष द्यावे, असे आईला वाटायचे. त्यामुळे कुटुंबीयांचा या कामाला विरोधच होता. मात्र, त्यांचे भाऊ प्रविण आणि प्रफुल्ल या दोघांनीही त्यांना साथ दिली. कोणालाही न सांगता कॅटरिंगचे जे काम घेतले होते ते पूर्ण करायचे ठरले आणि यशस्वीपणे त्यांनी ते करूनही दाखवले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या ओळखीचे केतकर मोतीवाले त्यांच्या घरी आले आणि वडिलांचे अभिनंदन करू लागले. आई-वडिलांना विष्णू यांचा अभिमान वाटला. हे सर्व काम आई-वडिलांचा पाठिंबा नसताना देखील विष्णू यांनी पूर्ण करून दाखवले होते. तेव्हापासून त्यांनी कॅटरिंगचे काम घ्यायला सुरुवात केली. पण, वय लहान असल्याने कोणी काम द्यायचे नाही. त्यामुळे ते आईला सोबत घेऊन जायचे. आई काम मिळवून द्यायची आणि ते यशस्वीपणे पूर्ण करत होते.

हेही वाचा -जिल्हा परिषदांमध्ये आता "एफएमएस' प्रणाली; ग्रामविकास विभागाने घेतला निर्णय 

रात्रभर घराच्या गॅलरीतून स्वीट मार्टच्या दुकानाकडे पाहत होतो -
विष्णू मनोहर कॅटरिंगच्या व्यवसायात उतरले होते. त्यांच्या हाताखाली काही माणसं काम करत होते. पण, त्या माणसांनी चांगले काम करावे यासाठी स्वतःला चांगले पदार्थ बनविता येणे गरजेचे होते. त्यामुळे त्यादृष्टीने त्यांनी अभ्यास सुरू केला. रस्त्यावर कुठे पावभाजीवाला किंवा चॅटवाला दिसला की त्याच्याजवळ थांबून तो कसं बनवतो, याचे ते निरीक्षण करत होते. तसेच घराच्या समोरच एक स्वीट मार्ट होतं. घराच्या गॅलरीमध्ये रात्र-रात्र उभं राहून तो स्वीट मार्टवाला पदार्थ कसा बनवतो? हे पाहत होते. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःही नवनवीन पदार्थ बनवायला सुरुवात केली. मात्र, पदार्थ बनविला म्हणजे काम संपलंय, असे नाही. एका शेफला त्या पदार्थाची सुंदर मांडणी करता येणे गरजेचे आहे. विष्णू मनोहर यांना चित्रकलेचे वारसा होताच. त्यामुळे ते अतिशय सुंदररितीने पदार्थ सजवत होते.  

अशी झाली कुकरी शोची सुरुवात -
वेगवेगळ्या भाज्या तयार करण्याचे काम सुरूच होते. एकदा त्यांनी एक भाजी बनविली आणि एका रोटरी क्लबच्या मॅडमला खूप आवडली. या सर्व रेसिपी त्यांच्या रोटरीच्या महिलांना शिकवायची ऑफर विष्णू मनोहर यांना मिळाली. त्यांनी हे काम देखील पूर्ण केले. त्यानंतर आपण चांगलं बोलू शकतो, लोकांना समजावून सांगू शकतो, याबाबत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी कुकरी शो करायला सुरुवात केली. मात्र, फिल्म इंडस्ट्रीची आवड असल्यामुळे त्यांना आधी टेलिव्हिजन चॅनलवर शो करायचे होते. त्यांचे ते स्वप्न देखील पूर्ण झाले. अनेक नावाजलेल्या टीव्ही चॅनेलवर त्यांनी कुकरी शो केले. त्यापैकी 'मेजवानी' नावाचा शो तब्बल १४ वर्ष गाजला.  

हेही वाचा - काय आहे इकॉर्निया वनस्पती? कशी करते भूगर्भातील पाण्याची पातळी कमी?

२२ हजार रेसिपी असलेले खाद्यकोष -
विष्णू मनोहर यांनी अनेक विक्रम रचले. त्यामध्ये विविध भाज्या, पराठे यांचा समावेश आहे. तसेच रुमाली रोटी, लंबी रोटी हे पदार्थ बनविणारी त्यांची पहिली कंपनी आहे. आतापर्यंत त्यांनी खाद्यपदार्थांविषयी ५२ पुस्तके लिहिली आहेत. आता ते २२ हजार रेसिपी असलेले खाद्यकोष लिहित आहेत. गेल्या ८ वर्षांपासून त्यावर काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. 

खवय्यांसाठी सल्ला -
कुठलाही पदार्थ बनविणे ही एक कला आहे. त्यामागे विज्ञान आहे. त्यामुळे तुमची आई, बायको, एखादा कुक कोणीही कुठलाही पदार्थ बनविला, तर त्याच्या तोंडावर हा पदार्थ वाईट झाला, असं बोलू नये, असा सल्ला आंतरराष्ट्रीय शेफ डे च्या निमित्ताने विष्णू मनोहर यांनी खवय्यांना दिला. 

एकाचवेळी चार भूमिका -

विष्णू मनोहर यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्यांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे. या क्षेत्रात आले म्हणजे भरपूर पैसा मिळेल, असे नाही. त्यासाठी मेहनत करावी लागेल. कुठलाही पदार्थ बनविताना मन लावून करणे गरजेचे आहे. एकाचवेळी शेफला विचारवंत, टेकनिशियन, चित्रकार आणि शेफ, अशा चार भूमिका पार पाडायच्या असतात. त्यामुळे तुमच्या खवय्यांना खाऊ घालताना चांगलं कसं देता येईल, याचाच विचार शेफने नेहमी करायचा असतो, असे विष्णू मनोहर यांनी सांगितले.