कोरोनाचा विषाणू अख्ख्या नागपूरवर भारी; वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण; निवासी डॉक्टरच देताहेत लढा

केवल जीवनतारे 
Tuesday, 15 September 2020

सध्या स्थितीत १७०० वर मृत्यू झाले तर ५५ हजारांजवळ बाधितांचा आकडा पोहचला. मेयो-मेडिकलमधील उपचार यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे.

नागपूर : उपराजधानीत ‘मे’, जून पासून कोरोना रुग्णांचा भार दर दिवसाला मेयो आणि मेडिकलवर वाढत गेला. प्रारंभी रुग्ण कमी असल्याने कोरोनाचा भार सांभाळण्यात मेयो, मेडिकलला यश आले. परंतु अनलॉकनंतर मात्र नागपूरची परिस्थिती बिकट झाली. 

सध्या स्थितीत १७०० वर मृत्यू झाले तर ५५ हजारांजवळ बाधितांचा आकडा पोहचला. मेयो-मेडिकलमधील उपचार यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. कोरोनाचा विषाणू मेयो-मेडिकलवर भारी पडला असून त्या विषाणूला नियंत्रणात आणण्यात अपयश येत आहे. तरीही दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर खऱ्या अर्थाने कोरोना विरुद्ध युद्ध करीत आहेत.

महत्त्वाची बातमी - अत्यंत दुर्दैवी! रिमझिम पावसात खेळण्याचा तिला आवरला नाही मोह आणि घडली हृदयद्रावक घटना

सुरुवातीला मेयो रुग्णालयात ५५ जणांचे मनुष्यबळ होते तर तेथील कोविड हॉस्पिटलमध्ये ६०० खाटा होत्या. त्यावेळी डॉ. तिलोत्तमा पराते यांच्या पथकाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कोरोना नियंत्रणात ठेवला होता. परंतु अलीकडे मनुष्यबळ दुप्‍पट करण्यात आले. एम्सच्या डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. मात्र त्यानंतरही मेयोत कोरोना नियंत्रणात आला नाही. मेडिकलमधील परिस्थिती विपरीत होती. मेडिकलमध्ये सुरुवातीला १०३ जणावर कोरोना नियंत्रणाचा भार होता. ज्यांच्यावर कोविडचा भार होता, ते वरिष्ठ अधिकारी कधीच कोरोना वॉर्डात शिरले नाही. मात्र ते कोरोनाबाधित झाले. 

मेडिकलमध्येही ६०० खाटांचे कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले. १२०० खाटांमध्येच नागपुरातील ४० लाख लोकसंख्येचा भार आहे, असे म्हणावे लागते. नागपुरातील मेयो, मेडिकलमधील मेडिसीन, प्रसूती रोग विभाग, भुलरोग विभाग, कान नाक घसा व श्वसनरोग विभागातील निवासी डॉक्टर तसेच ट्रॉमा केअर सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी या युद्धात प्रामाणिकपणे जीव मुठीत घेऊन लढत आहेत.

खासगी रुग्णालये हाउसफुल

कोरोनाबाधितांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतरही खाट मिळेल याची शाश्वती नाही. खासगीतील संबंधितांना फोन करून एक खाट उपलब्ध करून द्या, असे म्हटल्यानंतरही खाटाच नाही, रुग्णालय हाउसफुल्ल आहे, असे उत्तर संबंधितांकडून मिळते. खासगी रुग्णालयात १६०० वर खाटा आहेत. परंतु या खाटांवर गरीबांसाठी उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

अस्थायी योद्ध्यांना स्थायी करा

राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील १२० ते ३६४ दिवसांसाठी नियुक्त सहाय्यक प्राध्यापक इमाने इतबारे कोरोनाच्या रुग्णांना सेवा देत आहेत. मात्र त्यांना मागील दशकापासून कायम करण्यात आले नाही. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत या अस्थायी योद्ध्यांना स्थायी करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र मेडिकल टिचर्स असोशिएशनतर्फे सचिव डॉ. समीर गोलावार यांनी केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: huge pressure on doctors in mayo and medical in nagpur