अपमान जिव्हारी लागला विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

प्रेमप्रकरणाचे पर्यवसान तिच्या आत्महत्येत झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.

हिंगणा (जि.नागपूर)  : हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहगाव झिल्पी येथे राहणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तिने विहिरीत उडी घेतली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. प्रेमप्रकरणाचे पर्यवसान तिच्या आत्महत्येत झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.

क्‍लिक करा - प्रेमासाठी वाट्‌टेल ते , प्रियकराला वाचविण्यासाठी केले असे

शेजारच्या मुलाशी जुळले होते प्रेमसंबंध

प्राप्त माहितीनुसार, विद्यार्थिनी ही बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. हिंगणा भागातील एका महाविद्यालयात ती शिकत होती. मुलीची तिच्या मोठ्या वडिलांच्या घराजवळ राहणाऱ्या एका तरुणासोबत ओळख झाली. मुलीचे नेहमी मोठ्या वडिलांकडे येणे-जाणे होते. त्यामुळे भेटीगाठीत तरुणासोबत नेहमी तिचे बोलणे होत होते. दोघांच्या बोलण्यातून आकर्षण निर्माण झाले. यातून पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. याची कुणकूण तरुणाच्या लहान भावाला लागली. त्याने मंगळवारी मुलीच्या महाविद्यालयात जाऊन भरवर्गात तिच्याशी वाद घातला. "आपल्या भावाशी तू का भांडतेस' यावरून त्याने वाद घातला. भरवर्गात झालेले बोलणे विद्यार्थिनीच्या मनात घर करून गेले. तिच्यात अपमानाची भावना निर्माण झाली. इतरांसमोर असा प्रसंग घडल्याने ती खचून गेली होती.

क्‍लिक करा -तिकीट कापले ना, आता बंडखोरी होणारच !

दिवसभर तिच्या मनात अपमानाची भावना होती. यातूनच तिने सायंकाळी परिसरातील विहिरीत उडी घेतली. विहिरीच्या काठावर तिची ओढणी आढळल्याने लागलीच मृत विद्यार्थिनीची ओळख पटली. घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. नागरिकांनी हिंगणा पोलिसांना सूचना केली. तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी तिच्या वडिलांच्या सूचनेवरून तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, पुढे तक्रार प्राप्त झाल्यास पोलिस आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Humiliation triggers student suicide