तिकीट कापले ना... आता बंडखोरी होणारच!

Zilha parishad election
Zilha parishad election

नागपूर : आघाडीचे तिकीट वाटप करताना कॉंग्रेसने कुरघोडी केल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्येही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. विशेष म्हणजे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसने अनेक दिग्गजांना तिकीट नाकारले. यात माजी अध्यक्ष संध्या गोतमारे, उपाध्यक्ष शरद डोणेकर, चंद्रशेखर चिखले, कल्पना चहांदे, योगेश वाडीभस्मे, नंदा नारनवरे, तक्षशीला वाघधरे आदींचा समावेश आहे. यामुळे जिल्हा परिषदेची यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असल्याचे दिसते. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार शेवटचा दिवस होता. 58 जिल्हा परिषद सर्कलसाठी 497 व पंचायत समितीच्या 116 गणासाठी 737 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पक्षाकडून शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वच तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते. अनेकांना पक्षाच्यावतीने दिला जाणारा बी फार्मची गरज होती. मात्र, अखेरच्या वेळी अनेकांना उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी लढविणार असल्याचे तूर्तास जाहीर केले आहे. 

चर्चेत असलेल्या बड्या नावांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे मनोहर कुंभारे यांनी सावनेर तालुक्‍यातील केळवद जिल्हा परिषद सर्कलमधून, नाना कंभाले कोराडीमधून, मौदा तालुकाध्यक्ष व माजी उपाध्यक्ष तापेश्‍वर वैद्य यांनी धानला, भारती पाटील यांनी सोनेगाव-निपानी, वडोदा सर्कलमधून अवंतिका लेकुरवाळे, मनोज तितरमारे यांनी वेलतूर तर शांता कुमरे यांनी वडंबा सर्कलमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. नांद सर्कलमधून भाजपच्या प्रतिभा मांडवकर, गुमथळामधून अनिल निधान, पारडसिंगा सर्कलमधून संदीप सरोदे, मेटपांजरामधून प्रवीण अडकिणे यांनी अर्ज दाखल केला आहे. 

आमदारपुत्रांचे नामांकन

माजी मंत्री तसेच काटोलचे आमदार अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी येनवा आणि मेटपांजरा अशा दोन ठिकाणी उमेदवारी दाखल केली. हिंगण्याचे माजी आमदार व मंत्री रमेश बंग यांचे पुत्र दिनेश बंग यांनी रायपूर जिल्हा परिषद सर्कलमधून उमेदवारी दाखल केली आहे. माजी उपाध्यक्ष बंडू उमरकर यांचे पुत्र निखिलेश उमरकर यांनी मेंढला पंचायत समितीतून अर्ज दाखल केला आहे. 

भाजपने कापले यांचे तिकीट

भाजपने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे, महिला बालकल्याण सभापती वंदना पाल, कन्हानचे नगराध्यक्ष शंकर चहांदे यांच्या पत्नी व माजी जि. प. सदस्य कल्पना चहांदे, माजी सभापती अजय बोढारे, रामटेकचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर ढोक यांना उमेदवारी दिली नाही. जि. प. सदस्य शुभांगी गायधने यांनी पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केला.

22 वर्षांची राजश्री सर्वांत तरुण उमेदवार

उमरेड तालुक्‍यातील मकरधोकडा-पाचगाव जिल्हा परिषद सर्कलमधून 22 वर्षीय राजश्री प्रमोदसिंग गेहलोत हिने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे. त्या जिल्हा परिषदेतील सर्वांत तरुण उमेदवार ठरणार आहेत. त्यांच्या नामांकनाच्या वेळी त्यांच्या वयावरून चांगलीच चर्चा रंगली होती. 

सहा तालुक्‍यांत राष्ट्रवादी नाही

जिल्ह्यातील कळमेश्‍वर, कामठी, मौदा, रामटेक, भिवापूर व सावनेर तालुक्‍यांत कॉंग्रेसने एकही जागा मित्रपक्ष राष्ट्रवादीसाठी सोडली नाही. त्यामुळे बंडखोरांची संख्या वाढली आहे. स्थानिक आमदारांनी आपल्या सर्कलमध्ये दुसरा गट बळकट होऊ नये याची खबरदारी घेतल्याचे यावरून दिसून येते. 

प्रहारचा नाराजांना आधार

जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने भाजप व शिवसेनेने नाकारलेल्या उमेदवारांना आधार दिला आहे. प्रहारकडून उमेदवारी अर्ज दाखल शिवसेनेच्या शीतलवाडीच्या सरपंच योगिता गायकवाड तसेच रामटेक विधानसभा क्षेत्रात बहुतांश उमेदवार प्रहारचे उमेदवार झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com