मुख्याध्यापिका पत्नी करायची मारहाण, अपमान असह्य झाल्याने पतीचा राग झाला अनावर...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

मुख्याध्यापिका पत्नी मंजुषा नाटेकर ही सतत अपमानित करायची. मारहाणही करायची. सतत होत असलेल्या अपमानामुळेच पत्नी मंजुषा व तिला वाचिवण्यासाठी आलेले मामेसासरे अशोक रामकृष्ण काटे (वय 70) यांची हत्या केल्याची कबुली दत्तात्रयनगरमधील दुहेरी हत्याकांडातील मारेकरी व मंजुषा यांचे पती जयंतराव नाटेकर याने पोलिसांना दिली.

नागपूर : उच्चशिक्षित आणि मुख्याध्यापिका असलेली पत्नी नेहमी मारहाण करायची आणि अपमान करायची. पत्नीच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पत्नीचा खून केला तर तिच्या बचावासाठी आलेल्या मामेसासऱ्याचाही गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपी पतीने पोलिसांना दिली. या दुहेरी हत्याकांडाची शहरभर चर्चा असून न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मंजुषा जयंतराव नाटेकर (56, रा. प्लॉट क्रमांक 40, देशमुख अपार्टमेंट, फ्लॅट नंबर एफ 4, दत्तात्रय नगर, मेनरोड एनआयटी गार्डनजवळ, नागपूर) आणि अशोक रामकृष्ण काटे (70, रा. जवाहर नगर, नागपूर) अशी मृतकांची नावे असून जयंत यशवंतराव नाटेकर (60) हे मारेकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापिका पत्नी मंजुषा नाटेकर ही सतत अपमानित करायची. मारहाणही करायची. सतत होत असलेल्या अपमानामुळेच पत्नी मंजुषा व तिला वाचिवण्यासाठी आलेले मामेसासरे अशोक रामकृष्ण काटे (वय 70) यांची हत्या केल्याची कबुली दत्तात्रयनगरमधील दुहेरी हत्याकांडातील मारेकरी व मंजुषा यांचे पती जयंतराव नाटेकर याने पोलिसांना दिली.

- महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला साथ देण्यास तयार

कंटाळून खून केल्याची आरोपीची कबुली
बुधवारी दुहेरी हत्याकांड उघडकीस आल्यानंतर सक्करदरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून जयंतराव याचा शोध सुरू केला. बुधवारी रात्री रेल्वेस्थानक परिसरात पोलिसांनी जयंतरावला अटक केली. सक्करदरा पोलिसांनी गुरुवारी जयंतरावला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची 11 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

मंजुषा या गजानन बहुउद्देशिय शिक्षण संस्थेद्वारे संचालित न्यू सुभेदार ले-आऊट येथील भारतीय ज्ञानपीठ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका होत्या. जयंतराव हे व्होल्टास कंपनी चालक होता. त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर मंजुषा व जयंतरावमध्ये सतत वाद व्हायचे. मंजुषा या जयंतराव यांना मारहाण करुन अपमानित करायची.

- ज्याच्यावर होती पालन-पोषण करण्याची जबाबदारी, त्यानेच ओलांडली सीमा

सोमवारीही दोघांमध्ये वाद झाला. मंजुषा यांनी जयंतरावला मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या जयंतरावने मंजुषा यांचा गळा घोटला. त्यानंतर चाकूने त्यांच्यावर वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. मंजुषा यांच्या बचावासाठी आलेले अशोक यांचाही जयंतरावने गळा आवळून खून केला. दोघांची हत्या केल्यानंतर जयंतरावने काही काळ टीव्ही बघितला. त्यानंतर घराला कुलूप लावून पसार झाला. दोन दिवसांपासून मंजुषा या शाळेत न आल्याने एका शिक्षकाने त्यांचे भाऊ राजू खनगने यांच्या मोबाइलवर संपर्क साधला.

मंजुषा या शाळेत येत नसल्याचे शिक्षकाने सांगितले. त्यानंतर राजू हे मंजुषा यांच्या दत्तात्रयनगरमधील घरी गेले. कुलूप उघडले असता मंजुषा व अशोक हे मृतावस्थेत दिसले. माहिती मिळताच सक्करदराचे ठाणेदार अजीत सीद यांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी दोघांचे मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केले. पोलिसांनी जयंतरावच्या मोबाइल टॉवरचे लोकेशन तपासून सक्करदरा पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरात जयंतरावला अटक केली.

मित्राकडे ठोकला मुक्‍काम
पत्नी व मामेसासऱ्याची हत्या केल्यानंतर जयंतराव मित्राकडे गेला. एक दिवस मित्राकडे राहिला. मंगळवारी तो मित्राच्या घरून बाहेर पडला. त्यानंतर सतत भटकत होता. बुधवारी रात्री अजमेरला जाण्याच्या तयारीत असतानाच रेल्वेस्थानकावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भीतीपोटी तो शरण गेला नाही.

- पुन्हा टिवटिव : अमृता फडणवीस कोणाला म्हणाल्या, झाले गेले विसरूनी जावे
 

मुलाशी होता अबोला
मख्याध्यापिका मंजुषा यांचे मुलगा सूजय याच्यासोबत पटत नव्हते. त्यामुळे दोघे मायलेकांत बोलणे होत नव्हते. परंतु, वडील जयंतराव हे मुलाच्या संपर्कात होते. ही बाब माहिती होताच पत्नी मंजुषा यांनी दोनदा मारहाण केल्याची माहिती आरोपी पतीने दिली. तसेच घरातील भांडी घासणे, स्वयंपाक करणे आणि कपडे धुण्यावरूनही पत्नी मारहाण करीत होती, अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband beaten by educated wife at nagpur