अनेकांचे घराचे स्वप्न भंगले : बांधकाम क्षेत्राला महागाईची किनार; लोखंड, सिमेंटच्या दरात वाढ

Increase in the price of iron and cement
Increase in the price of iron and cement

नागपूर : सिमेंटचे भाव वाढल्यानंतर आता पुरसे कच्चे लोह उपलब्ध होत नसल्याने बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडाचे भाव २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे नुकतेच सावरू लागलेले बांधकाम क्षेत्र पुन्हा मंदावण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांत जालना, नागपूर, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या लोखंडी सळ्यांची विक्री होते. सध्या ओडिशा राज्यातील आर्यन ओरच्या खाणींचा करार संपला आहे. केंद्र सरकारने अद्याप या खाणींना मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे येथील उत्पादन बंद पडल्याने टंचाई निर्माण झालेली आहे. खाणीमधून मिळणारे कच्चे लोह कमी झाल्याने कच्चा माल महागला आहे. ही वाढ अधिक असल्याने प्रतिकिलो दर वाढविण्यात आले.

दीड महिन्यापूर्वी ३८ ते ४० रुपये किलो असणारा दर आता ४८ रुपये ५० रुपये एवढा झाला आहे. तसेच रोलिंग मिलला कच्चा माल मिळविण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्याने लोखंडी सळीच्या दरात प्रति किलो आठ रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज ॲण्ड ट्रेंडचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी दिली. वैयक्तिकरीत्या घर बांधण्याच्या तयारीत असलेल्या आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या शासकीय कंत्राटदारांचेही बजेट बिघडले आहे.

या दरवाढीचा परिणाम बांधकाम व्यवसायाला बसू लागला आहे. केवळ लोखंड-पोलाद नव्हे, तर सिमेंटच्या दरात वाढ झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र केड्राई संघटनेचे माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी दिली. लोखंडासह सिमेंटचे दरही प्रति बॅग २६०-२७० रुपयांवरून ३२० ते ३४० रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे व्यवसायातील गणिते पूर्णत: बदलून गेली आहेत.

कोरोनामुळे सदनिका विकत घेणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातच सळ्यांचे आणि सिमेंटचे दर वाढल्याने बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. डिझेल, वीज, कच्चा मालाची टंचाई असल्याने लोखंडाचे भाव वाढले आहेत. भाववाढीवर सरकारचेही नियंत्रण नसल्याने नियमित भाववाढ होत असल्याचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजेंद्र आठवले यांनी सांगितले.

पुरेशा प्रमाणात लोह मिळत नाही
लोह खाणींमध्ये पुरेशा प्रमाणात लोह मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. जुन्या खाणींचे नूतनीकरण न केल्याने तसेच काही खाणींचा लिलावही रखडला असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. कच्चा माल नसल्याचा परिणाम येत्या काळात सर्वच लोखंडी वस्तूंच्या उत्पादनावर होईल. 
- दीपेन अग्रवाल,
चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज ॲण्ड ट्रेड

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com