अरे वाह! इंडियन ऑईल उपराजधानीत करणार तब्बल इतक्या कोटींची गुंतवणूक; प्रकल्प अंतिम टप्प्यात

राजेश रामपूरकर
Wednesday, 26 August 2020

या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यापर्यंत हा प्रकल्प सुरू करण्याची योजना आहे,

नागपूर : इंडियन ऑईल कंपनी राज्यात एक हजार कोटींची नवीन गुंतवणूक करणार असून नागपुरात २०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे येथील एलपीजी बॉटलिंग प्रकल्पाची क्षमता १६ टक्क्यांनी वाढणार आहे. 

या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यापर्यंत हा प्रकल्प सुरू करण्याची योजना आहे, अशी माहिती महाराष्ट्र आणि गोवा राज्य कार्यालयाचे कार्यकारी संचालक व राज्य प्रमुख अमिताभ अखौरी यांनी वेबिनारच्या माध्यमातून पत्रकारांशी बोलताना दिली.

हेही वाचा - डॉक्टर तुम्हीसुद्धा? व्यापाऱ्यास लावला ७२ हजारांनी चुना, कसा काय बुवा?

नवीन एलपीजी प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील सुमारे ७.६१ लाख ग्राहकांपर्यंत येथून गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. कंपनीच्या राज्य कार्यालयाने पुणे, रायगड, नागपूर आणि औरंगाबाद येथे सहा मोबाइल फ्युअल वितरक (एमएफडी) सुरू केले आहे. २०२० च्या अखेरीस महाराष्ट्र आणि गोवा राज्यात आणखी दहा मोबाइल फ्युअल वितरक सुरू करण्यात येणार आहे. त्यापैकी एक एमएफडी नागपूर शहरात कार्यान्वित करण्यात येणार आहे.

प्रत्येक दारी डिझेलचे वितरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली इंडियन ऑईलने एक्सप्रेसशन ऑफ इंटरेस्ट देखील जारी केले आहे. त्यामुळे ते या उपक्रमासाठी स्टार्ट-अप्सची नोंदणी करणार आहे. या अंतर्गत कोणताही स्टार्टअप उद्योग, डीडीडी पुनर्विक्रेता, व्यापार संवर्धन विभाग (डीपीआयआयटी) वाणिज्य व उद्योग मंत्रालयासह (एमओसी अँड आय) स्वतःची नोंदणी करू शकणार आहे. यातून इंडियन ऑइलचे फ्युअलअंट्स (इंधन आणि उद्योजक) होऊ शकते. या उपक्रमामुळे उद्योजकता वाढेल आणि डिझेल विक्रीत ग्राहक सेवा सुधारेल अशी अपेक्षा आहे.

क्लिक करा - डॉ.अंशूजा किंमतकर यांनी असे काय केले की ठरला विक्रम

टाळेबंदी सुरु झाल्यापासून संपूर्ण भारतात इंडियन ऑइलने ३३६ प्रकल्पांवर काम सुरू केले. प्रत्येक प्रकल्पावर १ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. याचा अंदाजित प्रकल्प खर्च १.०४ लाख कोटी इतका आहे. कोरोना वायरस महामारीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी २,६७४ कोटी खर्च करण्यात आले आहे. नागपूर विभागात ६.८७ लाख उज्ज्वला लाभार्थ्यांना रिफिल पुरविण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian oil will invest 200 crore in Nagpur