भरचौकात साजरा केला वाढदिवस, सोशल मीडियावर व्हिडिओ टाकताच घरी पोहोचले पोलिस

योगेश बरवड
Friday, 29 January 2021

क्लिपची पडताळणी करीत तातडीने दोन्ही आरोपींना हुडकून काढत त्यांना भारतीय हत्यार कायद्यान्वये अटक केली. 

नागपूर : चित्रपटातील डॉन प्रमाणेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी तरुणांचा उपद्‍व्याप सुरू होता. त्यातच गुरुवारी टोळीच्या म्होरक्याचा वाढदिवस भरचौकात तलवारीने केक कापून साजरा करण्यात आला. या घटनेची क्लिप समाजमाध्यमांवरून व्हायरल झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अंबाझरी पोलिसांनी टोळीतील दोघांना जेरबंद करीत त्यांचा खरपूस समाचार घेतला. 

हेही वाचा - आता सर्व उपग्रहांची स्थिती माहिती करणे होणार शक्य, नागपुरातील विद्यार्थ्यांची भन्नाट आयडिया

आर्यन भेंडे (१९) रा, हिलटॉप ऑटो स्टँडजवळ, ऋषभ कुमरे (२१) रा. अंबाझरी टेकडी, अजयनगर अशी आरोपींची नावे आहेत. हिलटॉप व लगतच्या भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी एकत्र येत टोळी तयार केली आहे. परिसरात दहशत तसेच प्रतिस्पर्धी गटात धाक निर्माण करण्यासाठी तलवारीने केक कापण्याचा आणि सोशल मीडियावरून चित्रीकरण व्हायरल करण्याचा नवाच पायंडाच शहरात पडला आहे. आर्यन आणि ऋषभ यांनीही अशाच प्रकारे आज हिलटॉप ऑटो स्टँड परिसरात वाढदिवस साजरा केला. अंबाझरीच्या डीबी पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक आशिष कोहळे स्टाफसह गस्त घालत होते. याच दरम्यान घटनेबाबत गुप्त माहिती मिळाली. या गंभीर प्रकाराची दखल पोलिसांनी घेतली. क्लिपची पडताळणी करीत तातडीने दोन्ही आरोपींना हुडकून काढत त्यांना भारतीय हत्यार कायद्यान्वये अटक केली. 

हेही वाचा - ...अन् विजयी उमेदवारच झाला पायउतार, काही दिवसातच आनंदावर पडलं विरजण

देशी पिस्टलसह आरोपी अटकेत - 
देशी बनावटीचे पिस्टल घेऊन कारमधून फिरणाऱ्या आरोपीला तहसील पोलिसांनी मोमिनपुऱ्यातील एमएलए कॅन्टीनजवळून अटक केली. सैय्यद राजिक अली ऊर्फ सैय्यद सरवत अली (२२) रा. जाफरनगर, सादीकाबाद कॉलनी असे आरोपीचे नाव आहे. तहसील पोलिसांचे पथक गस्तीवर असताना गुरुवारी पहाटे ४.२० वाजताच्या सुमारास राजिक हा मोमिनपुरा भागातील एमएलए कॅन्टीनजवळ मारुती रिट्झ कारमध्ये संशयास्पदरीत्या असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठून त्याचा चौकशी केली. उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने अंगझडती व कारमध्ये झाडाझडती घेण्यात आली. कारमध्ये देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two arrested for having dangerous weapon in nagpur crime news