रक्तबंबाळ अवस्थेत शेतात पडून होती तरुणी; काकानं खांद्यावर घेत पायी पार केलं तब्बल ३ किमी अंतर 

सूरज पाटील
Friday, 29 January 2021

अगदी क्षुल्लक वादाचं रूपांतर कधी प्राणघातक हल्ल्यात होईल सांगता येत नाही. अशीच एक घटना जिल्ह्यातील घाटंजी इथे घडली आहे.  

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढतच चाललं आहे. अगदी क्षुल्लक वादाचं रूपांतर कधी प्राणघातक हल्ल्यात होईल सांगता येत नाही. अशीच एक घटना जिल्ह्यातील घाटंजी इथे घडली आहे.  

शेतात काम करण्यासाठी चुलत बहिणीसोबत गेलेल्या तरुणीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजता दरम्यान घाटंजीपासून काही अंतरावर असलेल्या मारेगाव रोड शिवारात घडली.

हेही वाचा - अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर केले लग्न; तीन वर्षांनी पतीला शिक्षा झाल्याने पत्नीने ढाळले अश्रू

राखी ढोणे (वय२२,रा. घाटी बेघर),असे गंभीर जखमी तरुणीचे नाव आहे. राखी शेतात काम करीत असताना संशयित  चिंतामण कवडू ढोणे (वय२७) याने काही विचार न करता तरुणीच्या पोटात चाकू खुपसला. तीन ते चार घाव पोटात भोसकल्याने राखी रक्ताने माखली आणि खाली कोसळली. दरम्यान तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला. 

लगेच तिच्या काकाने खांद्यावर उचलून तीन किलो मीटर अंतर पायपीट करीत रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. 

हेही वाचा - भरचौकात साजरा केला वाढदिवस, सोशल मीडियावर व्हिडिओ टाकताच घरी पोहोचले पोलिस

घाटंजी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किशोर घोघरे  फरार मारेकरी तरुणाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे घाटंजी शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncle crossed 3 kilometer distance to save life of girl in Yavatmal