अनलॉक, तरीही उद्योगांसमोर काळोखच, ही आहेत कारणे...

Industry in Deep Trouble Due to Corona
Industry in Deep Trouble Due to Corona

नागपूर  : जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील उद्योग सुरू झाले असले, तरी कच्चा माल, दळणवळण, पुरेशा प्रमाणात ऑर्डर व मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे उद्योगांना हवी तशी गती मिळालेली नाही. कोरोनाच्या भीतीमुळे टाळेबंदीतून मुक्तता झालेली असली तरी अद्यापही त्याची भीती कमी झालेली नाही. त्यामुळे परस्परांना प्रत्यक्ष भेटणे टाळले जात असल्याने निर्णयही प्रलंबित आहेत. त्याचा फटकाही उद्योगाच्या उत्पादनावर होत असल्याची अडचण उद्योजकांनी व्यक्त केली. 

टाळेबंदीमुळे तब्बल 45 दिवस देशभरातील उद्योगांची चाके थांबली होती. राज्याचा आर्थिक गाडा पुन्हा पुढे ठकलण्यासाठी काही नियम व अटींवर उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार जवळपास दीड महिनाभरापासून जिल्ह्यातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्‍वर, उमरेड, भिवापूर, मौदा या औद्योगिक वसाहतींमधील उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली. या औद्योगिक वसाहतींमधील सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठे, असे मिळून एकूण 3500 उद्योग आहेत. यापैकी सध्या 2 हजार 900 उद्योग सुरू झाले आहेत. मात्र, पूर्ण ताकदीने उत्पादन सुरू करण्यासाठी ऑर्डर, वाहतूक, कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा, कुशल आणि अकुशल कामगारांची कमतरता ही उद्योगांसमोरील मोठी आव्हाने आहेत. 

सध्या देशभरातील मार्केट काही प्रमाणात मार्केट सुरू झाले असले, तरी अजून मालाला पाहिजे तसा उठाव नाही. त्यामुळे उत्पादन वाढविण्यावर उद्योगांना मर्यादा आलेल्या आहेत. सध्या अवघ्या 40 ते 45 टक्के क्षमतेने उत्पादन काढले जात आहे. पुरेशा ऑर्डर नसल्यामुळे उद्योजक चिंतित आहेत. तसेच मुंबई, अहमदाबाद या शहरातून मोठ्या प्रमाणात कच्चा माल येथील औद्योगिक वसाहतीत येतो. तो कच्चा मालही अद्याप येणे सुरू झालेले नाहीत. तसेच कोरोनाच्या भीतीमुळे उद्योजकांकडून पैसे मिळेल की नाही याची शाश्‍वती नसल्याने अनेक कच्चा माल पुरवठा करणारे व तयार केलेला माल पाठविण्यासाठी पुढे येत नसल्याची नवीनच अडचण पुढे आलेली आहे. 

कच्चा माल आता उपलब्ध आहे; पण वाहतूक व्यवस्था (ट्रान्सपोर्टिंग) पूर्ण क्षमतेने नसल्याने उत्पादित माल बाहेर पाठविण्यावर आणि कच्चा माल आणण्यावर मर्यादा आहेत. कोरोनाला घाबरून क्‍लीनर, ड्रायव्हर, माल चढवणारे- उतरवणारे लोक कामावर येण्यास अजूनही तयार नाहीत. सध्या 85 टक्के उद्योग सुरू झाले आहेत. उत्पादित मालाला पाहिजे तसा उठाव नाही. ट्रान्सपोर्टिंगची समस्या अजून सुटलेली नाही. देशभरातील विविध मोठ्या शहरांमध्ये कच्चा माल उपलब्ध आहे; पण मुंबईमध्येच ट्रेडर असून, ही दोन्ही शहरे रेड झोनमध्ये असल्यामुळे पाहिजे तशी ट्रान्सपोर्टिंग सुरू झालेली नाही. 


बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू झालेले असले तरी अनेक दिवसांपासूनचे उत्पादन स्थिरावलेले आहेत. मागणी कमी असल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून खेळते भांडवल मिळण्याचा मार्ग सुकर झालेला असला तरी उद्यापही खासगी बॅंकांकडून कर्ज मिळत नाही. मुंबई हे बऱ्याच उद्योगांसाठी महत्त्वाचे शहर असल्याने तेथून कच्चा माल येणे बंद असल्याने उद्योग सुरू असले तरी ते अंशतः सुरू आहेत. 
शशिकांत कोठारकर, सचिव बुटीबोरी मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com