दक्षिण नागपुरात धो-धो

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जून 2020

यंदा लवकर पाऊस आल्याने बळीराजा खुष असून, हळूहळू पेरण्यांनाही सुरूवात झाली आहे.

नागपूर : विदर्भात सक्रीय असलेल्या मॉन्सूनने लागोपाठ दुसऱ्याही दिवशी उपराजधानीला दणका दिला. दुपारच्या सुमारास अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन- तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्याने "वीकेंड'पर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

रविवारी मुसळधार पावसाने तासभर झोडपून काढल्यानंतर अपेक्षेप्रमाणे आजही पावसाने जोरदार तडाखा दिला. दुपारी दोननंतर शहरातील जवळपास सर्वच भागांत हलक्‍या ते जोरदार सरी बरसल्या. विशेषत: दक्षिण नागपुरात धो-धो पाऊस पडला. त्यानंतरही सायंकाळपर्यंत रिपरिप सुरूच होती. दोन दिवसांपासून विदर्भात सगळीकडेच जोरदार पाऊस सुरू आहे.

यंदा लवकर पाऊस आल्याने बळीराजा खुष असून, हळूहळू पेरण्यांनाही सुरूवात झाली आहे. सोमवारी विदर्भात चंद्रपूर येथे सर्वाधिक 63 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. वाशीम येथेही (60 मिलिमीटर) जोरदार बरसला. याशिवाय अमरावती व वर्धा जिल्ह्यांतही मॉन्सूनने दमदार हजेरी लावल्याचे वृत्त आहे. नागपुरात सायंकाळी साडेपाचपर्यंत 13.3 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आले. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

शहरात एक जूनपासून आतापर्यंत 168 मिलिमीटर पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवस विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिलेला असल्याने हा आठवडाही पावसाचाच राहणार आहे. 19 जूनच्या आसपास बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचा पट्‌टा तयार होणार असल्याने त्यानंतरही विदर्भात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: monsoon in nagpur city continue on second day