ऐसी धाकड है धाकड है, रे छोरीया, ये छोरीया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना खेळासाठी "मोटिव्हेट' करायला पाहिजे. बबिताने "हार को गले नहीं लगाना और जीत को सीर पर भी नहीं बिठाना' असे कानमंत्र देत खासदार क्रीडा महोत्सवाचा युवा खेळाडूंनी पुरेपूर फायदा उचलण्याचे आवाहन केले.

नागपूर : खेळामुळे नवी "एनर्जी' व ताकद मिळते. आयुष्यात खूप काही शिकायला मिळते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींना खेळासाठी प्रेरित करून "धाकड' बनविण्याचे आवाहन, अर्जुन पुरस्कारविजेती आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू "दंगल गर्ल' बबिता फोगटने तिसऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी केले. धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर रविवारी सायंकाळी आयोजित रंगारंग उद्‌घाटन समारंभात तिने नागपूरकरांना विशेषत: मुलींना खेळात करिअर करण्याचा सल्ला दिला.
छोटेखानी भाषणात बबिता म्हणाली, मुलांसाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. त्याचवेळी त्यांनी खेळालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. जास्तीतजास्त मुलांनी खेळाच्या मैदानावर जायला पाहिजे. खेळामुळे मुलांना खूप काही शिकायला मिळते. यात करिअरची उत्तम संधी आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना खेळासाठी "मोटिव्हेट' करायला पाहिजे. बबिताने "हार को गले नहीं लगाना और जीत को सीर पर भी नहीं बिठाना' असे कानमंत्र देत खासदार क्रीडा महोत्सवाचा युवा खेळाडूंनी पुरेपूर फायदा उचलण्याचे आवाहन केले.

सविस्तर वाचा - तरुणाईच्या मुखी एकच आवाज, काय पो चे

 

व्यासपीठावर अभिनेते खासदार सनी देओल, अभिनेते शरद केळकर, बबिताचे पती विवेक सुहाग, महोत्सवाचे आयोजक व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, क्रीडामंत्री सुनील केदार, खासदार डॉ. विकास महात्मे, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, परिणय फुके, माजी मंत्री ऍड. सुलेखा कुंभारे, माजी आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, महापौर संदीप जोशी, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव आदी उपस्थित होते.
सनी देओल यांनी खेळामुळे मुलांमध्ये शिस्त व खेळभावना निर्माण होऊन तंदुरुस्तीसाठी मुलांना मैदानावर जाण्याचे आवाहन केले. तसेच खासदार महोत्सवाच्या निमित्ताने मुलांना उत्तम व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल गडकरी यांची स्तुती केली. शरद केळकर यांनीही नागपूरकरांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. गडकरी यांनी खेळाडूंसाठी शहरात 50 नवे स्टेडियम बांधण्याचा संकल्प बोलून दाखवित खासदार महोत्सवात खेळाडू व पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महोत्सवाला यशस्वी बनविण्याचे आवाहन केले. तर क्रीडामंत्री सुनील केदार यांनी मुलांना सोशल मीडियाचा नाद सोडून नियमित खेळ खेळण्याचा सल्ला दिला. महापौर संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले. आरजे राजन यांनी संचालन केले. जवळपास दोन आठवडे चालणाऱ्या या महोत्सवात एकूण 31 क्रीडा प्रकारांचा समावेश असून, विजेते खेळाडू व संघांना 426 आकर्षक ट्रॉफींसह 78 लाखांचे रोख पुरस्कार दिले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Innogration of khasdar krida mhotsav in Nagpur