कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऊर्जामंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

अभियंते, कर्मचारी व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. 

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाने महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना 30 लाखांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. सोबतच कंत्राटी कर्मचारी (बाह्यस्त्रोत) व सुरक्षा रक्षकांना देखील 30 लाखांच्या विम्याचे कवच देण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. 

कोरोनाच्या संकटकाळातही राज्यातील सुमारे 2 कोटी 60 हजार ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व अखंडित सेवा देण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अविश्रांत कार्यरत आहेत. अभियंते, कर्मचारी व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. 

अधिक माहितीसाठी - शिक्षकांनो व्हा सावधान ! दहा शिक्षकांवर झाली "ही' कारवाई, काय गुन्हा होता "त्यांचा', वाचा...
 

राज्य प्रशासन कोरोनाचा पराभव करण्यासाठी प्रयत्नरत असताना राज्यातील सामान्यांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरातच राहणाऱ्या व घरूनच कामे करणाऱ्यांना महावितरणने 24 तास अखंडित वीजपुरवठा देऊन मोठा दिलासा दिला आहे. याद्दष्टीने महावितरणचे कर्मचारीदेखील कोरोनायोद्धे ठरलेत. कर्मचाऱ्यांची सुरक्षा, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभागाने गांभीर्य राखून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

महावितरणचे तांत्रिक तसेच अतांत्रिक प्रवर्गात कार्यरत असणारे सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी सानुग्रह अनुदानास पात्र आहेत. कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोविड-19 विषाणूने झाल्याचे असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र शासकीय, पालिका, महानगरपालिका, आयसीएमआर नोंदणीकृत खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे सादर करणे आवश्‍यक आहे. हे सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी कामावरील उपस्थितीबाबत अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहणर असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insurance cover for MSEB contract employees and security guards also