बहुराष्ट्रीय कंपन्यांकडेच एकवटली जगाची संपत्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग आणि प्रादेशिक विकास अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल सेंटर पॉइंट येथे "शाश्‍वत विकास आणि जागतिकीकरण' विषयावर दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. गुरुवारी उद्‌घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्याहस्ते करण्यात आले.

नागपूर : जागतिकीकरणाचा स्वीकार करताना आपल्या देशाचा संबंध इतर देशांसोबत येतो. यामुळे आर्थिक व्यवहारही वाढतो. यामागचा उद्देश सर्वांना फायदा व्हावा असा असतो. जागतिकीकरणामुळे सर्वांचा समान आर्थिक विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आज काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जगातील सर्व संपत्ती एकवटली असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग आणि प्रादेशिक विकास अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल सेंटर पॉइंट येथे "शाश्‍वत विकास आणि जागतिकीकरण' विषयावर दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. गुरुवारी उद्‌घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. स्नेहा देशपांडे, परिषदेच्या समन्वयक डॉ. अपर्णा समुद्र यांची उपस्थिती होती.

वर्धा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या माहिती आहे का?
 

अर्थशास्त्र विभागाच्या परिषदेचे उद्‌घाटन
डॉ. थोरात म्हणाले, भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार उदार अंत:करणाने केला. यामुळे आर्थिक देश जोडले जातील व आपला विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, जागतिकीकरणाच्या एवढ्या वर्षांनंतरही संपत्ती केवळ काहीच लोकांकडे आहे. जागतिकीकरणानंतर दारिद्य्राचे प्रमाण वाढले नसले तरी ते कमीही झाले नसल्याचे ते म्हणाले. डॉ. विनायक देशपांडे यांनी जगातील आर्थिक स्थितीचा आढावा मांडला. तसेच जागतिक स्थिती सुधारायची असेल तर कुठल्या उपाययोजना करायला हव्या यावर माहिती दिली. डॉ. काणे यांनी "वसुधैव कुटुंबकम्‌' संकल्पना मांडत जागतिकीकरणाचा विचार करताना सर्वांगीण विकासावर भर द्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाला देशभरातून प्रतिनिधी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Conference at nagpur university