पाऊस जास्त पडतोय म्हणून वाढला ‘या’ सरपटणाऱ्या जिवाचा भयंकर उपद्रव...

नरखेडः फळ व पाने फस्त करायला संत्राच्या झाडावर चढलेल्या गोगलगायी.
नरखेडः फळ व पाने फस्त करायला संत्राच्या झाडावर चढलेल्या गोगलगायी.

जलालखेडा(जि.नागपूर)  :  पाऊस जास्त पडला की हे सरपटणारे जिव ओलाव्यात वास्तव्य करतात, असे जुने-जाणते शेतकरी सांगतात. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘त्या’ नरखेड तालुक्यातील शेतात आढळून येत आहेत. यामुळे सध्या बहारात आलेल्या सोयाबीन, कापूस, तूर, भुईमूग, उडीद, मूग यासारखी पिके ‘तिच्या’ प्रादुर्भावामुळे संकटात आली आहेत. तसेच या भागातील फळपिक संत्रा व मोसंबी त्ंयाच्या प्रभावात सापडले आहे. हे वाचविण्यासाठी शेतकरी वेळीअवेळी फवारण्या देखील करीत आहे. तरी मात्र अशा परिस्थितीत जी काही पिके शेतात तग धरून आहेत, त्या पिकांवर या सरपटणाऱ्या जिवाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसत आहे. पिक वाचविण्यासाठी मात्र यावर उपाय शोधताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येत आहे.

नुकसान टाळायचे तरी कसे?
शंखी (गोगलगायी) यंदा मोठ्या प्रमाणात शेतातील पिके व फळपिकांवर दिसायला लागल्याने शेत पिकांना जास्त धोका निर्माण होऊ लागला आहे. अगोदर उत्पादन खर्चाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना या शंखी गोगलगायीने अधिक संकटात टाकण्याची भिती निर्माण केली आहे. सध्या कसेबसे वाचलेल्या पिकांवरच ही शंखी गोगलगाय हल्ला करू लागली आहे. त्यामुळे या पिकांचे नुकसान कसे टाळता येईल, याकडे शेतकरी लक्ष देऊ लागले आहेत. पण यातून पिक वाचतील की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  :  ऐका नागरिकांनो, खुद्द जिल्हाधिकारी जिल्हयातील वाढत्या कोरोनाच्या संदर्भात काय म्हणतात..

संत्रा, मोसंबी पिकाला उपद्रव वाढला
गेल्या २-३ दशकांपासून गोगलगायींची संख्या इतकी वाढली आहे की, गवतसुद्धा त्यांच्या उपजीविकेसाठी कमी पडू लागले आहे, आणि त्यामुळे त्या पिकांवर अतिक्रमण करून उपजीविका करू लागल्या आहेत. उष्ण व दमट हवामान आणि खाद्याच्या अमाप उपलब्धतेमुळे गोगलगायींची वाढ झपाट्याने वाढून शेतकऱ्यांपुढे एक नवीन संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे या शंखी गोगलगायीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. ही अकिटकीय कीड बहुविध पिकांना उपद्रव करत असल्यामुळे भावी उद्रेकीय बहूभक्षी कीड म्हणून पिकांना धोका पोहचवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिक वाचा  :  नरखेड तालुक्यातील ५८ सेवा सहकारी संस्थांचे रुपांतरण झाले २४ संस्थेत, काय भानगड आहे, वाचा....

कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरु
गोगलगायीची शरीराचे विभाजन डोके, शंख व पाय या तीन विभागात होते. काही गोगलगायींच्या पाठीवर शंख असतात, त्यांना "शंखी गोगलगायी", तर काही गोगलगायींच्या पाठीवर शंख नसतात, त्यांना "शेंबे गोगलगायी" म्हणतात. या गोंगलगायीचे व्यवस्थापन कसे करावे, असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. याबाबत तालुका कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरु झाले व त्याचा अहवाल देखील करण्यात आला आहे. तसेच नरखेड पंचायात समितीच्या कृषी विभागाचे अधिकारी यांनी याबाबतची माहिती प्राप्त करून तसा अहवाल जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवावा, अशी मागणी माजी सभापती वसंत चांडक यांनी केली आहे.

सामूहिकरीत्या व्यवस्थापन करा
नरखेड व काटोल तालुक्यात प्रथमच गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सध्या यामुळे जरी संत्रा, मोसंबी पिकाचे नुकसान होत असले, तरी मात्र इतर पिकांना ही धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे त्याचे व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या करावे व तसेच याबाबत डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या किटकशास्त्रज्ञांनी काही उपाययोजना सुचविल्या आहे. त्यांचा ही शेतकऱ्यांनी अवलंब करावा.
विजय निमजे
उपविभागीय कृषी अधिकारी, काटोल


शेतकरी बांधवांनो, हा उपाय करा !
फळउत्पादक शेतकऱ्यांनी, तसेच शेतकऱ्यांनी गव्हाचा कोंडा, गूळ व मेटाल्डीहाईड ( ५ टक्के ) ३० ते ५० ग्राम यांचे मिश्रण करून त्यांचे गोळे झाडाजवळ खाली जागेत ठेवावे. पण हे करताना किमान पाच दिवस अन्य प्राण्यांना तेथे जाण्याप्सून मज्जाव करावा. तसेच शेताचे बंध स्वच्छ ठेवावे. गोगलगायी पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीतून बाहेर पडतात व जून ते सप्टेंबर दरम्यान सक्रिय राहतात. म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या किडीच्या नियंत्रणासाठी सलग २ ते ३ वर्षे राबवणे आवश्यक आहे.
डॉ. योगीराज जुमडे, तालुका कृषी अधिकारी, नरखेड

 

संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com