कारागृहातील कैद्यांना ड्रग्स पुरविणारा कर्मचारी निलंबित, बुधवारी पकडले होते रंगेहात

अनिल कांबळे
Saturday, 23 January 2021

बुधवारी सायंकाळी मंगेश व अन्य चार रक्षक कारागृहात कर्तव्यावर हजर होण्यासाठी आले. कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे व अन्य अधिकारी कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी कर्मचारी व रक्षकांची झडती घेत होते.

नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील कर्मचाऱ्यांकडूनच कैद्यांना अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या तुरुंग रक्षकाला बुधवारी रंगेहात पकडण्यात आले. त्याला शुक्रवारी तुरुंग उपमहानिरीक्षकांनी निलंबित केले. मंगेश मधुकर सोळंकी (२८, रा सहकारनगर), असे तुरुंगरक्षकाचे नाव आहे.

हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच...

बुधवारी सायंकाळी मंगेश व अन्य चार रक्षक कारागृहात कर्तव्यावर हजर होण्यासाठी आले. कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे व अन्य अधिकारी कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी कर्मचारी व रक्षकांची झडती घेत होते. तेव्हा मंगेश घाबरला. कुमरे यांचा संशय बळावला. अधिकाऱ्यांनी त्याचे मोजे तपासले. त्यात दोन पुड्या दिसल्या. त्या उघडून बघितल्या असता २८ गॅम चरस आढळले. कुमरे यांनी धंतोली पोलिसांना माहिती दिली . त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मंगेशला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. दरम्यान , या प्रकरणाचा अहवाल कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी तुरुंग उपमहानिरीक्षक रमेश कांबळे यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावावर उपमहानिरीक्षकांनी कारवाई करून कैद्यांना ड्रग्स पुरविणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित केले.

हेही वाचा - दोघांनीही बघितले सुखी संसाराचे स्वप्न, पण एक व्यसन लागलंय अन् सर्वच संपलं

आरोपी अकोला येथील रहिवासी असून तो २०१८ मध्ये तुरुंगरक्षक म्हणून नियुक्त झाला होता. त्याचे येत्या फेब्रुवारी महिन्यात लग्न होणार होते. त्यातच आता कारागृहातील कैद्यांना ड्रग्स पुरविताना तो सापडला. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली असून त्याला निलंबित करण्यात आले आहे. गोपी नावाच्या कैद्याला हे ड्रग्स पुरविले जात होते, अशीही माहिती समोर आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jail employee suspended who provide drugs to prisoners in nagpur