संघर्ष : दिसायला सुंदर नसल्याने व्हायचा छळ; मग झाला सामाजिक कार्यकर्त्याचा जन्म (व्हिडिओ)

सतीश तुळसकर
Sunday, 24 January 2021

सुरुवातीपासून ते आतापर्यंत ५ हजार कुटुंबाचे कौटुंबिक वादातून पुनर्वसन केले असून, लॉकडाउनच्या काळात ६० कुटुंबाचे कलह मार्गी लावून पतिपत्नीत समेट घडवून आणला. 

उमरेड (जि. नागपूर) : नाव जेबुन्नीसा शेख... शालेय जीवनापासूनच महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने झपाटलेल्या... मात्र, पहायला सुंदर नसल्याने सासरच्या मंडळीकडून सुरू झाला मानसिक त्रास... यातून स्वःताला सावरत ३० वर्षांपासून महिला सक्षमीकरण, सबलीकरण तसेच तळागाळातल्या दुर्बल घटक, शोषित, पीडितांसाठी अविरत कार्य करीत आहे... समाजसेवेसाठी त्यांनी जातिधर्माचे पाश तोडले, हे विशेष...

जेबुन्नीसा शेख यांच्या वडिलांकडील परिस्थिती हलाखीची असल्यामुळे कसेबसे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वयाच्या २२ व्या वर्षी मुस्लिम समाजाच्या परंपरेनुसार गृहस्थाशी विवाहबद्ध झाल्या. अवघ्या सात वर्षांच्या संसारानंतर दोन मुलांना घेऊन उमरेड येथे पितृगृही परतल्या.

नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

तेथून त्यांनी आजतागायत समाजसेवेचा वसा सांभाळत आहेत. पतीने घटस्फोट दिल्यानंतर दोन लेकरांना सांभाळायची जबाबदारी पार पाडत शिवणकाम, भरतकाम आणि पेंटिंगसारख्या कलागुणांच्या जोरावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू लागल्या.

फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांनी भारलेल्या शेखताई इतक्यावरच थांबल्या नाहीत तर ज्या परिस्थितून दिवस काढावे लागले ती वेळ कुण्या दुसऱ्या स्त्रीवर येऊ नये यासाठी त्यांनी मोफत कौटुंबिक समुपदेशन, पती-पत्नी समेट घडवून परिवार एकत्रीकरण करणे, दुर्बल महिलांना मोफत शिवणकाम शिकवून आत्मनिर्भर बनविणे, तसेच दुर्बल घटकातील अनेक मुला-मुलींना शिक्षणात पुढे जाण्यास मदत करणे, कर्जबाजारी शेतकऱ्यांना व्यक्तींना सावकाराच्या जाचातून सोडविणे, हुंडाबळी, स्त्री अत्याचार, अंधश्रद्धा निर्मूलन, झोपडपट्टी दारूबंदी तसेच महिलांना न्याय मिळवून देण्याचे समाजकार्य सुरू केले.

जाणून घ्या - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

१९९३-९४ ला संत गाडगेबाबा अभियानांतर्गत ३५६ गावांमध्ये ‘जाती तोडो, समाज जोडो’ अभियान यशस्वीरीत्या राबविले. १९९६ पासून चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी व वन कामगारांच्या संघटनेत उपाध्यक्षपदी काम केले. महाराष्ट्रात २६ हजार कामगार नियमित केले. २००१ साली भारतीय संविधानाची जनजागृती करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात सायकल मार्च काढला.

२५ ऑक्टोबर २००२ नागपूर येथे दहा हजार मुस्लिम बांधवांचा मेळावा घेतला. २००५ ला वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या दलित, आदिवासी आणि ओबीसी यांची संघटना बनवून ४५ दिवस आंदोलन करून त्यांना जमिनीचे पट्टे मिळवून दिले व अजूनही उर्वरित लोकांकरिता संघर्ष सुरू असल्याचे शेखताई सांगतात.

नक्की वाचा - दोघांनीही बघितले सुखी संसाराचे स्वप्न, पण एक व्यसन लागलंय अन् सर्वच संपलं

महिला सुरक्षा समिती उमरेड, जनहित संघर्ष समिती विदर्भ प्रदेश, चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी कामगार संघटना, काळीपिवळी चालक मालक संघटना, जबरान जोत शेतकरी, शेतमजूर, कामगार व महिला संघटना, घरेलू महिला कामगार इत्यादी संघटनांमध्ये त्या सक्रिय आहेत.

सुरुवातीपासून ते आतापर्यंत ५ हजार कुटुंबाचे कौटुंबिक वादातून पुनर्वसन केले असून, लॉकडाउनच्या काळात ६० कुटुंबाचे कलह मार्गी लावून पतिपत्नीत समेट घडवून आणला. 

माहेरच्या मंडळींच्या हस्तक्षेपामुळे होतात संसार उद्ध्वस्त
पूर्वी फार कमी लग्न मोडायचे. अलीकडच्या काळात महिलांच्या हिताचे अनेक पोषक कायदे आहेत. त्याचा गैरफायदा होताना दिसून येतो. बऱ्याचवेळा मुलीच्या माहेरच्या मंडळींच्या हस्तक्षेपामुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या बऱ्याच घटना घडतात. तेव्हा माझं मुलींना एकच सांगणं आहे की स्वतःच्या बुद्धीचा वापर करून निर्णय घ्यावे. ज्यामुळे कुणाचे संसार उद्ध्वस्त होणार नाही.
- जेबुन्नीसा शेख,
सामाजिक कार्यकर्त्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jebunnisa Sheikh who strives for social service