बापरे, खेळाच्या बनावट प्रमाणपत्रांद्वारे लाटल्या नोकऱ्या! 

file photo
file photo


नागपूर  : राष्ट्रीय पातळीवर पदक जिंकल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकरी लाटण्याचा अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपुरातही असे बोगस खेळाडू समोर आले आहेत. याप्रकरणी दोनजणांविरुद्ध पोलिसांत तक्रारही करण्यात आल्याची माहिती आहे. 


क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी न होता भरमसाठ पैसे देऊन बोगस प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकरी लाटण्याचे अनेक प्रकार राज्यातील विविध विभागांमध्ये उघडकीस आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात बोगस प्रमाणपत्र विक्री करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आहे. या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारावर जवळपास ४० बोगस खेळाडूंनी मंत्रालयासह पोलीस सेवेत नोकरी लाटल्याचे समजते. यामागे मोठे रॅकेट असल्याचे व कोट्यावधींचा व्यवहार झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. या बोगस खेळाडूंकडून एका प्रमाणपत्रासाठी तब्बल तीन ते साडे तीन लाख रुपये घेण्यात आल्याचे समजते. 


यासंदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही ही बाब मान्य केली. ते म्हणाले, आम्ही जिम्नॅस्टिकमधील ट्रॅपोलिन प्रकारातील २६१ प्रमाणपत्रांची पडताळणी केली असता, त्यात जवळपास २५८ प्रमाणपत्रधारक बनावट आढळून आले आहे. इतरही खेळांमध्ये अशा प्रकारचे बनावट प्रमाणपत्रधारक असू शकतात, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय कार्यालयातील उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन अवघ्या दोन महिन्यात हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. उल्लेखनीय म्हणजे ट्रॅपोलिनच्या स्पर्धांच झाल्या नसल्याची माहिती आहे. 


राज्यात सर्वाधिक बोगस प्रमाणपत्रधारक खेळाडू औरंगाबाद विभागात आढळून आले. नागपूर विभागातही २१ बोगस प्रमाणपत्रधारक मिळाल्याची माहिती आहे. यातील दोघांविरुद्ध उपसंचालक व जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी 'सकाळ'ला दिली. बनावट प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा समावेश असल्याचे समजते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील पदकविजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्राच्या आधारावर शासकीय सेवेत पाच टक्के आरक्षण आहे. याचा गैरफायदा घेत अनेकांनी शासकीय सेवेत नोकऱ्या लाटली असण्याची दाट शक्यता आहे. इतरही खेळांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट प्रमाणपत्रधारक खेळाडू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. 

राज्यात विविध विभागांमध्ये खेळांचे बोगस प्रमाणपत्र मिळविल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. हे प्रकरण अतिशय गंभीर असून, त्यामुळे पात्र खेळाडूंवर अन्याय होत आहे आणि बोगस खेळाडू नोकऱ्या मिळवीत आहेत. असे प्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक विभागाने काळजी घेणे आवश्यक आहे. '


-ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा आयुक्त, पुणे 

संपादन : नरेश शेळके 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com