महापौर निर्णयावर ठाम, मुंढेंच्या पत्राला बगल, वाचा काय आहे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेचा कार्यभार स्वीकारला, त्या दिवसापासूनच महापौर आणि आयुक्तांमध्ये खटके उडत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना महापौर जोशींनी मुंढेंवर आरोप केले होते. त्यांच्या प्रत्येक आरोपाला मुंढेंनी उत्तर दिले.

नागपूर : सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून येत्या 20 जून रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील कोरोना संक्रमित काही परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहेत. या सभेला अशा परिसरातील नगरसेवक येणार असल्याने कोरोनाचे संक्रमण होऊ नये, म्हणून सभा रद्द करण्याची विनंती करणारे पत्र आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौर संदीप जोशी यांना दिले. त्यावर "सभा तर घेणारच...', असा पवित्रा महापौरांनी घेतला. त्यामुळे आयुक्त आणि महापौर यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी पेटतच चालला असल्याचे दिसत आहे.

3 जूनला तुकाराम मुंढे यांच्या वाढदिवसाला महापौर संदीप जोशी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. भेटीसाठी कधीही वेळ न देणाऱ्या मुंढेंनी यावेळी महापौरांना तत्काळ भेटण्यासाठी वेळ दिला होती. त्यानंतर महापौर आणि आयुक्त यांच्यातील संबंध आता सुधारू लागतील, अशी अपेक्षा महापालिका वर्तुळात व्यक्त केली जात होती. पण, ती अपेक्षा फोल ठरली. त्यानंतर या दोघांमधील वातावरण आणखी बिघडत गेले. आता तर महापालिकेच्या बैठकीवरून दोघे पुन्हा आमने-सामने आले आहेत. त्यामुळे हा संघर्ष थांबणारा नाही, असे बोलले जात आहे.

युवकाने तलवारीने कापला केक; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांची वाढली डोकेदुखी, असा झाला घोळ...

तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेचा कार्यभार स्वीकारला, त्या दिवसापासूनच महापौर आणि आयुक्तांमध्ये खटके उडत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना महापौर जोशींनी मुंढेंवर आरोप केले होते. त्यांच्या प्रत्येक आरोपाला मुंढेंनी उत्तर दिले. आता सर्वसाधारण सभेवरून दोघांत वाद उफाळून आला आहे. त्यामुळे हा वाद आता कोणते वळण घेईल, याकडे प्रशासनासह नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Joshi insisted on the decision, ignoring Mundhe's letter