युवकाने तलवारीने कापला केक; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांची वाढली डोकेदुखी, असा झाला घोळ...

Young man arrested for cutting cake with sword
Young man arrested for cutting cake with sword

नागपूर : युवकाने आनंदाच्या भरात बर्थ डेच्या दिवशी तलवारीने केक कापला. केक कापतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. याची माहिती क्राईम ब्रॅंचला मिळाली. यामुळे पोलिस कारवाईसाठी गेले. पोलिसांनी युवकाला पकडले. मात्र, युवकाने तो मी नसल्याचे सांगितल्याने पोलिसांसमोर मोठा घोळ निर्माण झाला. खऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना तारेवरील कसरत करावी लागली. काय आहे हा संपूर्ण प्रकार... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हरीदास कांबळे (वय 21, रा. काशीनगर, रामेश्‍वरी रोड) याचा डेकोरेशनचा मोठा व्यवसाय आहे. दक्षिण परिसरात संकेत मंडप-डेकोरेशनचे काम असते. त्यासाठी त्याच्याकडे मोठमोठ्या गाड्यासुद्धा आहेत. तो परिसरात "रिकामे कामं' करण्यासाठी ओळखला जातो. त्याचा 13 जूनला 21 वा वाढदिवस होता. त्याने अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा प्लान केला.

यासाठी त्याने 13 जूनला सायंकाळी काही मित्रांना बोलावले. बर्थ डेसाठी मोठा केक मागवला. घराच्या छतावर मोठा स्पिकरही लावला. मित्रांसोबत डान्स केल्यानंतर त्याने घरातून मोठी चमचम करणारी तलवार आणली. त्या तलवारीने केक कापण्यासाठी सज्ज झाला. संकेतने मित्रांना मोबाईलने फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी सांगितले. 

जवळपास रात्री अकरा वाजेपर्यंत केक कापण्याचा कार्यक्रम आणि अन्य खाणे-पिणे झाले. त्यानंतर त्याने स्वतः सोशल मीडियावर तलवारीने केक कापल्याचे फोटो व्हायरल केले. अनेक ग्रुपमधून "भाई हॅप्पी बर्थडे' असा शुभेच्छांचा वर्षावही झाला. तर कुणी "नया डॉन' म्हणून भाईला विश केले. संकेतच्या पार्टीची परिसरात चर्चा होती.

बर्थडे बॉयला ठोकल्या बेड्या

संकेत कांबळेने तलवारीने केक कापल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांना मिळाली. त्यांनी लगेच बर्थ डे बॉयचा शोध घेतला. मोठा पिंपळ परिसरातून संकेतला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता तलवारही जप्त करण्यात आली. या तलवारीने तो येत्या काही दिवसात कोणतेतरी कांड करणार होता, अशी माहिती समोर आली आहे. 

जुळ्या भावाने केला 'लोचा'

संकेत कांबळेला जुळा भाऊ आहे. मात्र, तो खूप शांत स्वभावाचा आहे. तसेच संकेत तलवारीने केक कापत असल्याचे पाहून तो तेथून निघून गेला होता. मात्र, जुळा भाऊ असल्यामुळे संकेत ऐवजी पोलिसांनी त्याच्या भावाला पकडले. त्याने जुळा असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांचा विश्‍वास बसत नव्हता. शेवटी त्याने मोबाईलमधील दोघांचे सोबत असलेले फोटो दाखविल्यानंतर पोलिसांना विश्‍वास बसला. पोलिसांनी त्याला सोडून संकेतला पकडून आणले. जुळा भाऊ असल्यामुळे पोलिसांना तारेवरील कसरत करावी लागली, अशी चर्चा आहे. ही कारवाई पीआय अनिल ताकसांडे, संतोष मदनकर, रामनरेश शाहू, रवी शाहू, निनाजी तायडे आणि शेषराव राऊत यांनी केली.

तलवारीने केक कापण्याची गुन्हेगारांमध्ये फॅशन

संकेतने आनंदाच्या भरात बर्थ डेच्या दिवशी तलवारीने केक कापला. केक कापतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्या युवकाचा तोच अतिआत्मविश्‍वास नडला. तलवारीने केक कापल्याची माहिती क्राईम ब्रॅंचला मिळाली. पोलिसांनी बर्थडे बॉयचा शोध घेऊन अटक केली. याप्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीसुद्धा कुख्यात गुंडाने तलवारीने केक कापला होता. तेव्हापासून तलवारीने केक कापण्याची गुन्हेगारांमध्ये फॅशन झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com