आउटरवर रेल्वेगाडी थांबताच सक्रिय होतात झोपडपट्टीतील युवक अन्‌ उद्भवतो हा धोका...

Kharra on the train, the rampant sale of food
Kharra on the train, the rampant sale of food

नागपूर : नागपूरमार्गे धावणाऱ्या श्रमिक व राजधानी एक्‍स्प्रेस आउटरवर थांबताच लगतच्या झोपडपट्टीतील मुले धोकादायक पद्धतीने खाद्यपदार्थ, पाणी, जेवण, खर्रा अन्‌ गुटख्याची विक्री करतात. या धोकादायक प्रकारामुळे प्रवासी आणि नागरिकांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका बळावला आहे. नगरसेवक लखन येरावार यांनी या गंभीर बाबीची तक्रार डीआरएम कार्यालयात केली आहे. यानंतरही संबंधित यंत्रणांकडून डोळेझाक केली जात आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेसेवा थांबविण्यात आली. पार्सल व मालगाड्या धावत आहेत. श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. काही राजधानी स्पेशल गाड्याही चालविल्या जात आहेत. गाड्यांची संख्या वाढताच आउटरवर गाड्या थांबवून ठेवण्याचे प्रकारही वाढले आहेत. प्रवासात वेळीच जेवण-पाणी मिळत नसल्याची ओरड आता जुनी झाली आहे. त्यातच तासन्‌तास रेल्वेगाड्या आउटरवर थांबल्यामुळे प्रवाशांची अधिकच गैरसोय होत आहे. ही संधी "इन कॅश' करून घेण्यासाठी तकीया, धंतोली झोपडपट्टीतील काही युवक सरसावले आहेत.

प्रवासी गाड्या थांबताच युवक खाद्यपदार्थ, बाटलीबंद पाणी, चहा, नाश्‍ता, खर्रा, गुटखा विक्रीसाठी घेऊन येतात. कोरोनाच्या दहशतीमुळे शहरात हॉटेल्स, भोजनालये बंद असताना आउटरवर मात्र खाद्यपदार्थ सहजतेने उपलब्ध आहेत. हा प्रकार अनधिकृत आणि अत्यंत धोकादायक आहे. एखाद्या कोरोनाची बाधा असणाऱ्या प्रवाशाच्या संपर्कात विक्रेते आल्यास संपूर्ण झोपडपट्टीतच कोरोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

या गंभीर प्रकाराकडे नगरसेवक लखन येरावार यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकाराबाबत आरपीएफकडे विचारणा केली असता तातडीने विशेष मोहीम राबवून अवैध व्हेंडरचा बंदोबस्त करण्याच्या बाता केल्या जातात; पण कारवाई होणार तरी कधी, हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो. तक्रारीनंतर शनिवारी या परिसरात तीन जवान नियुक्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. यानंतरही हा प्रकार सुरूच होता.

सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

एकीकडे वृत्तांकनासाठी रेल्वेस्थानकावर जाणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव केला जातो. प्रतिनिधींना थांबविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने मेन गेटवर बंदोबस्त लावला आहे. परंतु, रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर अवैध व्हेंडरकडून खाद्यपदार्थ आणि गुटख्याची विक्री होते. त्याची मात्र दखल घेतली जात नाही. या प्रकाराने रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com