esakal | जिच्या काठावर वसले आहे अख्खे नागपूर त्या 'नाग नदीचा' इतिहास माहिती आहे का? नाही ना. मग जाणून घ्या 
sakal

बोलून बातमी शोधा

Know the information about Naag River located at Nagpur

नागनदीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? या नदीला 'नाग नदी' हे नाव कसं मिळालं? नक्की कुठून झाला नदीचा उगम? याबद्दलची माहिती तुम्हाला आम्ही आज देणार आहोत. 

जिच्या काठावर वसले आहे अख्खे नागपूर त्या 'नाग नदीचा' इतिहास माहिती आहे का? नाही ना. मग जाणून घ्या 

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखलं जाणारं नागपूर शहर निरनिराळ्या गोष्टींसाठी आणि ऐतिहासिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र नागपूर शहराची एक खास ओळख म्हणजे 'नाग नदी'. खर तर नाग नदीला 'नदी' म्हणण्याची देखील सोय आता उरली नाहीये. त्याचं कारण म्हणजे या नदीचा झालेला नाला. मात्र एकेकाळी नाग नदी शहराचं वैभवच नाही तर नागरिकांसाठी जीवनदायिनी होती. या नागनदीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? या नदीला 'नाग नदी' हे नाव कसं मिळालं? नक्की कुठून झाला नदीचा उगम? याबद्दलची माहिती तुम्हाला आम्ही आज देणार आहोत. 

काय आहे इतिहास? 

 दिल्लीचे नागरीकरण पाहून १८व्या शतकात गोंड राजा बख्त बुलंद शाहने आपली राजधानी देवगड (मध्यप्रदेश), छिंदवाडा जिल्ह्यातून वेगळी काढून, नाग नदीच्या काठावर राजधानी म्हणून नागपूर शहर वसवले. प्राचीन काळी या नदीच्या काठी नागवंशाचे लोक राहत असावेत म्हणूनच या नदीचे नाव नाग नदी असे झाले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बैद्ध धर्माची दीक्षा घेतली. दीक्षा समारंभासाठी नागपूरची निवड करण्यामागे नागवंशाचा महत्त्वाचा संदर्भ होता.

नागपूरजवळच्या लाव्हा गावानजीक असलेल्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर बंधारा बांधण्यात आला. त्याद्वारे निर्माण झालेल्या तलावास अंबाझरी तलाव (जुने नाव बिंबाझरी तलाव) म्हणतात. हा तलाव नागपुरातील तेलंगखेडी सोनगाव मार्गावर आहे. हा बिंबाझरी तलाव, आद्य रघूजी भोसले (इ.स. १७३० ते १७५५) यांच्या बिंबाजी नावाच्या पुत्राने बांधला होता. 

क्लिक करा - CBI, CID, NIA आणि  IB मध्ये नेमका फरक काय? सुशांतची केस CID कडे का दिली नाही? जाणून घ्या

भोसलेंच्या काळातील नाग नदी  

१८व्या शतकात, नागपूरला जीवन देणार्‍या या संजीवन नाग नदीचा पिण्याच्या पाण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी व धार्मिक कार्यांसाठी उपयोग होत होता. त्या काळात भोसले नरेशाने नाग नदीच्या काठी सुंदर देवळे, राजवाडे, उद्याने, स्मशान, राजघाट आणि काशीबाईचा घाट निर्माण केले. नागपूर शहरातल्या सीताबर्डी येथे बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या मागे नाग नदीला एक ओढा येऊन मिळतो. या संगमावर इ.स. १७७९ मध्ये दुसर्‍या रघूजीची आई व मुधोजीची पत्‍नी चिमाबाई यांनी  महादेवाचे देऊळ बांधले. या संगमावर दुसरे रघूजी आणि परिवार धार्मिक कार्यासाठी जात असत. भोसले राजे विजयादशमीला सकाळी घोडे, हत्तींना संगमावर आंघोळीसाठीआणत. हत्ती बुडू शकेल इतके खोल पाणी संगमावर होते. नदीच्या काठी शस्त्रपूजा आणि शमीची पूजा व्हायची. सायंकाळी भोसले परिवार सीमोल्लंघनासाठी नाग नदी ओलांडून राजाबक्षाच्या मारुतीला जायचा.  

बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून धंतोलीकडे जाणार्‍या रस्त्यावरचा पूल तिसर्‍या रघूजीने इ.स. १८३७मध्ये बांधला. संगम पूल या नावाने ओळखला जाई. त्यानंतर नाग नदी पटवर्धन ग्राउंड मोक्षधामावरून वाहते आणि सक्करदरामार्गे जाते. आज तो रस्ता ग्रेट कॅनॉल रोड या नावाने परिचित आहे.

दिवाळीत करण्यात येत असे रोषणाई 

काशीबाई मंदिरापासून वहात वहात नाग नदी तुळशीबागेजवळून जाते. या ठिकाणी म्हणजे आजच्या सी.पी. ॲन्ड बेरार कॉलेजसमोर डावीकडे मोगल शैलीतील मोठी तुळशीबाग आहे. तिची तशीच उजवीकडच्या बेलबागेची निर्मिती दुसर्‍या रघूजीने केली. आज संत्रीनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील पहिली संत्र्याची रोपे दुसर्‍या रघूजीनेच सियालकोट व औरंगाबादहून आणली आणि आधी तुळशीबाग परिसरात आणि नंतर सबंध जिल्ह्यात लावली. नाग नदीच्या काठी तुळशीबागेतच दुसर्‍या रघूजीने राजवाडा, नाट्यगृह आणि इतर इमारती बांधल्या. या राजवाड्यातच तो दुपारच्या विश्रांतीसाठी येत असे. दिवाळीत नाग नदीच्या तीरावर रोषणाई करण्यात येई, ती पाहण्यासाठी सबंध शहर जमा होत असे.

नाग नदीची आजची परिस्थिती

इ.स. १९५६पर्यंत या नदीत कपडेही धुतले जात. महालातील स्त्रिया हरतालिकेच्या गौरी विसर्जनासाठी नदीवर जात. नदी तोवर स्वच्छ होती. १९५६मध्ये नाग नदीच्या काठी देखणे बंगले होते. नदीच्या बाजूने डावीकडे अशोकाची झाडे होती.

या नदीला नागपूर शहराच्या हद्दीतच लहानमोठे २३५ नाले येऊन मिळतात. यांत पिवळी नदी, हत्ती नाला, सत्ती नाला, गड्डीगोदाम नाला, बाळाभाऊपेठ नाला, बुरड नाला, बोरियापुरा नाला, डोबीनगर नाला, लाकडीपूल नाला, तकिया नाला, नरेंद्रनगर नाला या मोठ्या नाल्यांचा समावेश होतो. सर्व नाल्यांचे घाणेरडे पाणी नदीत सोडल्यामुळे नाग नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. त्यामुळे एकूण १७ किलोमीटर लांबीची ही नदी आता जवळजवळ मृतप्राय झाली आहे. या नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्‍न चालू असतात..

अधिक माहितीसाठी -'डायमंड क्रॉसिंग' बघितले आहे का? देशातील एकमेव हिऱ्यासारखा दिसणारा रेल्वेमार्ग; वाचा सविस्तर

आपल्या घाणेरड्या पाण्यासह नाग नदी ही भिवकुंड टेकडीजवळ कन्हान नदीला मिळते. या प्रदूषित नदीमुळे गोसीखुर्दचे पाणी दूषित होत आहे व त्याचा प्रभाव वैनगंगा नदीवरही पडत आहे. नाग नदीतून सुमारे ३५० एमएलडी('मिलियन लिटर पर डे'-प्रतिदिन दहा लाख लिटर) पाणी वाहून ते वरील नद्यांना मिळते. त्यापैकी फक्त २०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया झालेली असते. त्यामुळे नाग नदीची स्वच्छता राखणे आपली जबाबदारी आहे.