अहिंसेने मोदी-शहांचा डाव हाणून पाडा : कुमार केतकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

देशात दंगली उसळाव्यात असे मोदी-शहांना वाटते आणि वाटत होते. दंगली उसळल्या असत्या तर देशात अंतर्गत आणीबाणी लावून धरपकड केली असती. पण, या देशातील दलित व मुस्लिमांनी संविधान तसेच तिरंगा हातात धरून अहिंसेच्या मार्गाने निषेध करणे सुरू केला आहे. मोदी व शहांना या अहिंसेचीच धास्ती बसली आहे.

नागपूर : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून भाजप धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगली भडकाव्या हे मोदी-शहा यांचे प्रयत्न अहिंसेनेच हाणून पाडा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.

वसंतराव देशपांडे सभागृहात संवैधानिक जागरण कार्यक्रमात आंबेडकरी विचारवंत सुखदेव थोरात, अन्वर सिद्दीकी, प्रफुल्ल गुडधे पाटील आदी उपस्थित होते. केतकर पुढे म्हणाले, मोदी व शहांचे या देशाचे विभाजन करून वेगळ्या प्रकारचे हिंदुराष्ट्र निर्माण करण्याचे मनसुबे आहेत. पारतंत्र्यात असताना हिंदू महासभा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाची फाळणी हवी होती. तीच मागणी मोदी व शहा सीएए, एनआरसी व एनआरआरच्या माध्यमातून पुढे नेत आहेत. त्यांना भारताचे हिंदुराष्ट्र करायचे आहे, असा आरोप केतकर यांनी केला.

या विषयावरून देशात दंगली उसळाव्यात असे मोदी-शहांना वाटते आणि वाटत होते. दंगली उसळल्या असत्या तर देशात अंतर्गत आणीबाणी लावून धरपकड केली असती. पण, या देशातील दलित व मुस्लिमांनी संविधान तसेच तिरंगा हातात धरून अहिंसेच्या मार्गाने निषेध करणे सुरू केला आहे. मोदी व शहांना या अहिंसेचीच धास्ती बसली आहे. देशभर होत असलेल्या आंदोलनांना चेहरा, नेतृत्व वा जाहीरनामा असे काहीही नाही. तेव्हा लोकांनी स्वयंस्फूर्त व स्वयंभू नेतृत्वाखालीच हे आंदोलन असेच अहिंसेने सुरू ठेवावे, असे आवाहन केतकर यांनी केले.

- Republic Day 2020 : लष्कराचे बँडपथक यावर्षीपासून वाजवणार ही धून... ऐकून तुमचेही जागेल देशप्रेम

मोदींना 2014 मध्ये 31 टक्के व 2019 मध्ये 31 टक्के मते मिळाली. म्हणजे 63 टक्के लोकांनी त्यांना मते दिली नाही. कागदपत्रे सादर करू न शकल्याच्या नावाखाली अशांची नावे मतदारयादीतून वगळण्याचे कारस्थान मोदी व शहांनी रचले आहे. कारण त्यांना उर्वरित 35 टक्‍क्‍यांच्या भरवशावर परत सत्तेवर यायचे आहे, असे केतकर म्हणाले.

- पालकांनो सांभाळा आपल्या मुलांना! अन्यथा...

 

"सीएए म्हणजे मनुस्मृतीचा उत्तरार्ध'
आज जगभरात 53 ते 57 मुस्लिम राष्ट्रे आहेत. या राष्ट्रात भारतीय काम करतात. तेथे हिंदूंची संख्याही लक्षणीय आहे. या देशांनी उद्या त्यांना मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला तर किती महागात पडेल याचा विचार होणे गरजेचे आहे, असे सुखदेव थोरात म्हणाले. सीएए म्हणजे मनुस्मृतीचा उत्तरार्ध असून दलितांना पुन्हा एकदा गावकुसाबाहेर काढण्याचे प्रयत्न असल्याचेही थोरात यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kumar ketkar on narendra modi and amit shah