सावरगावच्या भूमिपूत्राला आज अखेरचा निरोप, सुनील शिंदेवर दुपारी अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

काटोलचे माजी आमदार, म्हाडाच्या नागपूर विभागाचे सभापती तसेच शेतकरी, संत्रा उत्पादकांसाठी सातत्याने झटणारे सुनील शिंदे यांचे गुरुवारी (ता.11) काटोल येथे निधन झाले. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सावरगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मृत्युसमयी ते 86 वर्षांचे होते.

 
नागपूर:  सोनुबाबा म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या शिंदे यांच्या मागे पत्नी, तीन मुले असा आप्त परिवार आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती होते. काटोल विधानसभा मतदारसंघाचे 1984 ते 94 असे दहा वर्षे ते आमदार होते. यादरम्यान त्यांनी संत्रा उत्पादकांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने आंदोलने केली. हिवाळी अधिवेशन विधानभवन परिसरात त्यांनी उपोषण केले. त्यानंतर संत्रा उत्पादकांसाठी काटोल येथे प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले. संत्री उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मंत्री, आमदार, अधिकारी यांना ते संत्री भेट देत असत.

आणखी वाचा : काटोलमध्ये शिक्षणाची गंगा प्रवाहित करणारे सुनील शिंदे

अनेक विकासकामांची गंगा आणली
गावात शिक्षणाची सोय नसल्याने मुली शिकत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर 1990च्या दरम्यान शिंदे शिक्षण संस्थेची स्थापना करून त्यांनी काटोल-नरखेड तालुक्‍यात शैक्षणिक क्रांती घडवली. यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. गेली अनेक वर्षे ग्रामपंचायत, सावरगाव येथे त्यांची सत्ता होती. अनेक विकासकामांची गंगा त्यांनी सावरगाव तसेच आमदार म्हणून काटोल विधानसभेत आणली. काटोल तालुक्‍यातील डोंगरगाव येथे एमआयडीसी आणून तिथे औद्योगिक क्रांतीची सुरुवात केली.

हेही वाचा : तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला...पोरके करून गेला

गेल्या काही वर्षांपासून होते आजारी
गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. परंतु, त्यातही शेतकऱ्यांच्या बैठकांना आवर्जुन उपस्थित राहत. अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रचार सभांमध्येही त्यांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यांचा राजकीय आणि शैक्षणिक वारसा पुत्र, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सतीश शिंदे पुढे चालवत आहे.

चालता फिरता मृृत्यू
त्यांचे पुत्र सतीश शिंदे गुरुवारी सकाळी त्यांना भेटले, तेव्हा ते नेहमीप्रमाणे बोलले. शेतातील कामांबाबत विचारपूस केली. तसेच शेतीत गेल्यावर मोटर सुरू करावी, आंब्याच्या पेट्या भराव्या आदी सूचनाही नेहमीप्रमाणे दिल्या. त्यानंतर सतीश शिंदे शेतात गेले. थोड्याच वेळात घरून कॉल आला की बाबा बेशुद्ध झाले. सतीश शिंदे तातडीने घरी गेले. त्यावेळी त्यांची प्राणज्योत मालवलेली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Last farewell to Bhumiputra of Savargaon today, last rites on Sunil Shinde in the afternoon