नेतृत्व युवकांचे ! धोरणाची अंमलबजावणी मात्र रखडली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने युवा धोरण निश्‍चितीसाठी डॉ. संजय खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली 2014 मध्ये समिती गठित केली होती. या समितीने विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी आणि विद्यापीठेतर युवकांच्या समकालीन संदर्भातील गरजा लक्षात घेऊन अभ्यास केला. युवाशक्ती सक्षम, सामर्थ्यवान करून त्यांच्या ऊर्जेचा वापर करून विदर्भासारखा अविकसित प्रदेश देशाच्या नकाशावर समृद्ध व संपन्न भूभाग म्हणून उभा करण्याचा या युवा धोरणाचा उद्देश होता,

नागपूर : विदर्भासारखा अविकसित प्रदेश समृद्ध करण्यासाठी युवाशक्तीचा सहभाग वाढावा म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने "युवा धोरण' तयार केले. मात्र, चार वर्षांपासून धोरणाचे भिजत घोंगडे कायम आहे. राज्यात सक्षम युवा नेतृत्व असताना, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने युवा धोरण कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे.

अवश्य वाचा - रात्रीच्या अंधारात ते भेटले आणि....

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने युवा धोरण निश्‍चितीसाठी डॉ. संजय खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली 2014 मध्ये समिती गठित केली होती. या समितीने विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी आणि विद्यापीठेतर युवकांच्या समकालीन संदर्भातील गरजा लक्षात घेऊन अभ्यास केला. युवाशक्ती सक्षम, सामर्थ्यवान करून त्यांच्या ऊर्जेचा वापर करून विदर्भासारखा अविकसित प्रदेश देशाच्या नकाशावर समृद्ध व संपन्न भूभाग म्हणून उभा करण्याचा या युवा धोरणाचा उद्देश होता, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. खडक्कार यांनी दिली. या धोरणाचा अहवाल समितीने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2015 ला सादर केला. विशेष म्हणजे, अर्धा तास याचे सादरीकरणही करण्यात आले होते. या वेळी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्यासह उच्चशिक्षण सचिवही उपस्थित होते. विदर्भातील युवकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल होते. अहवालातील सूचनांनुसार विद्यापीठ स्तरावर युवकांसाठी विविध योजना आखल्या जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, चार वर्षांपासून या अहवालाचा विद्यापीठ आणि राज्य शासनालाही विसर पडला. आता राज्यात युवा नेतृत्वाला सत्तेत स्थान मिळाले आहे. त्यामुळे युवा धोरणावर चर्चा करणे अपेक्षित आहे.

या आहेत सूचना

राज्य सरकारतर्फे युवकांसाठी विविध योजना आखण्यात येतात. परंतु, बहुतांश योजना या क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांशी निगडित आहेत. युवकांना कुशल मनुष्यबळ म्हणून विकसित करण्यासाठी फारशा योजना नाहीत. विद्यापीठ पातळीवर त्या युवकांना विकसित करण्यासाठी एकत्रितपणे योजना राबवल्यिा जात नाहीत. त्यामुळे अशा निवडक योजना व उपक्रमांना विद्यापीठ पातळीवरही राबवून त्याचा लाभ मागास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देता येईल काय, त्याचाही युवा धोरणात विचार करण्यात आला होता.

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leadership Youth! However, the implementation of the policy was halted