Video : नाव राजलक्ष्मी अन डोक्यावर छप्परही नाही, कडाक्याच्या थंडीत फुटपाथवरचे जिणे

राघवेंद्र टोकेकर
रविवार, 5 जानेवारी 2020

"जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं? का फेकून द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये? आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने?' जगप्रसिद्ध "नटसम्राट' नाटकातील हे संवाद आजही अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणतात.

नागपूर : कधी कधी आयुष्यातले काही निर्णय चुकतात अन्‌ क्षणार्धात दैवाचे फासे फिरतात. सूर्यप्रकाशासारखी तळपणाऱ्या कोट्याधीश माणसांवरदेखील उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचे तुकडे होऊन जगण्याची वेळ येते. उपराजधानीतील हृदय हेलावणारी घटना, एकेकाळी राजलक्ष्मीचे आयुष्य जगणारी उच्चविद्याविभूषित शिक्षिका आज कडाक्‍याच्या थंडीत फुटपाथवरचे जिणे जगते आहे. "पुन्हा उष:काल कधी होणार' हा एकच सवाल ती निरागस डोळ्यातून जगाला विचारते आहे.

"जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं? का फेकून द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये? आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने?' जगप्रसिद्ध "नटसम्राट' नाटकातील हे संवाद आजही अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणतात.

मात्र हा राजलक्ष्मीच्या (बदललेले नाव) रोजच्या जगण्यातला प्रश्‍न आहे. 72 वर्षीय राजलक्ष्मी तिच्या मुलीला घेऊन व्हेरायटी चौकात राहते. एकेकाळी हिंदुस्थान कॉलनीत स्वत:च्या घरात राहणाऱ्या राजलक्ष्मीच्या पतीची तब्येत कायमच खराब असायची. मुलगा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक होता. गतिमंद मुलीचे सदरमधील प्रसिद्ध शाळेत शिक्षण झाले. तर स्वत: राजलक्ष्मीने तीन मोठ्या शाळांमधून विद्यादानाचे काम केले आहे. तिचे अनेक विद्यार्थी परदेशात स्थायिक झाले आहेत.

क्लिक करा - महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पुन्हा नागपूरकडे, यांना मिळाले गृहमंत्रिपद

राजलक्ष्मीच्या इतिहासातील घटना मानवी मनाला थक्‍क करणाऱ्या आहेत. 2002 साली पतीच्या आजारपणामुळे त्यांची संपत्ती हिसकावून घेतली. त्यानंतर भाड्याच्या घरात राहून राजलक्ष्मीला शिक्षिकेची नोकरी करणे भाग पडले. मुलगा पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक होता. 2013 साली राजलक्ष्मीला घेण्यासाठी शाळेत जात असताना मुलाचा रविनगर चौकात अपघात झाला.

हेही वाचा - मुनगंटीवारांनी राखला चंद्रपूर जि. प.चा गड, भाजपच्या रेखा कारेकार विजयी

राजलक्ष्मीच्या डोळ्यादेखत त्याला बसने चिरडले होते. त्यानंतर मुलाने तब्बल पंधरा दिवस मृत्यूशी झुंज दिली पण डॉक्‍टरांचे प्रयत्न अपयशी ठरले अन्‌ राजलक्ष्मीने वयात आलेला तिचा मुलगा गमावला. महत्त्वाचे म्हणजे अपघाताचे वृत्त राजलक्ष्मीने अंथरुणावर खिळलेल्या पतीला सांगितलेच नव्हते. मात्र पतीचे वर्षभरात अर्धांगवायूने निधन झाले. घर गेले, पती गेला, मुलगाही गेला, गतिमंद मुलीसोबत राजलक्ष्मी वर्धा मार्गावरील साईमंदिर परिसरात राहू लागली. तेथे फुलवाल्यांकडे हार विणायचे काम करून ती स्वत:चा उदरनिर्वाह करीत होती.

तिची स्थिती पाहून गहिवलेल्या एका महिलेने स्वत:च्या घरात राजलक्ष्मीला आसरा दिला. मात्र शेजारच्यांना गतिमंद मुलीचा त्रास सहन झाला नाही अन्‌ राजलक्ष्मी रस्त्यावर आली. शाळेत ज्या विद्यार्थ्यांना शिकवले त्यांनी सहकार्य करण्याच्या दृष्टीने राजलक्ष्मीची आश्रमात व्यवस्था केली. परंतु तिच्या आयुष्याला उष:काल मान्य नव्हताच. आज राजलक्ष्मी तिच्या 32 वर्षीय मुलीसोबत रस्त्यावर जगत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: life struggle of rajlaxmi nagpur