
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या "लॉकडाऊन'मुळे रोजमजुरी करणाऱ्या असंख्य गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मानकापूर येथील ठिय्यावरील मजूरही याला अपवाद ठरले नाहीत. हाताला कामे नसल्यामुळे अनेक मजूर रिकाम्या हाताने घरी परत जात आहेत. घरात अन्नाचा कण शिल्लक नसल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मानकापूर येथील ठिय्यावर दररोज असंख्य गोरगरीब मजूर कामाच्या उद्देशाने येत असतात. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे कुणालाच काम मिळत नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक जण बेरोजगार आहेत. त्यामुळे दोनवेळच्या जेवणाचेही वांधे आहेत.
समस्यांचा पाढा मांडताना झिंगाबाई टाकळीतील महेश इटनकर म्हणाले, गेल्या सहा-सात वर्षांपासून नियमितपणे ठिय्यावर येतो. मानकापूरचा ठिय्याच माझ्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. परंतु, दोन आठवड्यांपासून कामच मिळाले नाही. लॉकडाऊनमुळे ना बिल्डिंग ठेकेदार इकडे फिरकत आणि घरगुती कामेही मिळत नाहीत. थोडीफार जमापुंजी होती, तीदेखील संपली आहे. त्यामुळे किराणा, भाजीसह इतर आवश्यक सामान खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. घरी पत्नी व तीन मुले आहेत. मी कमावणारा एकटाच आहे. अशा परिस्थितीत काय करायचे, हा प्रश्न मला व कुटुंबियांना पडला आहे. एक-दोन दिवसांपासून पोलिसवाले व काही सामाजिक संघटनांचे लोक अन्नवाटप करीत आहेत. त्यावर कसेतरी जगत आहोत.
काय करावे काही सुचेना
कोरोनाने आमचे आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकले आहे. काम मिळेल या आशेने मी अन् पत्नी दररोज ठिय्यावर येऊन बसतो. मात्र, लॉकडाऊनमुळे कुणीही येत नाही. त्यामुळे नाईलाजाने घरी परत जातो. जवळपास पंधरा दिवस हा दिनक्रम सुरू आहे. काय करावे काही सुचत नाही.
- सुनील श्रीवास, मजुरी कामगार
सरकारने द्यावा मदतीचा हात
चाळीस वर्षांत पहिल्यांदाच अशी समस्या उद्भवल्याचे सांगून नशिबाला दोष दिला. या कठीण प्रसंगी सरकारने मदतीचा हात द्यावा.
- हरिश्चंद्र पिटकर, मानकापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.