टार्गेट- २०२१: कोरोनामुळे फटका बसला पण उणिवांवर केलं लक्ष केंद्रित; आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू मुग्धा आग्रेच्या भावना 

lots of things learned in corona situation said mugdha aagre
lots of things learned in corona situation said mugdha aagre

नागपूर : कोरोनामुळे खेळाडूंना तब्बल सात-आठ महिने मैदानापासून दूर राहावे लागले. सरावासोबतच स्पर्धांनाही मोठा फटका बसला. कित्येक दिवस घरांमध्ये फिटनेस करावे लागले. माझ्यासारख्या खेळाडूंसाठी हा कटू अनुभव असला तरी, खूप काही शिकायलादेखील मिळाले. सात ते आठ महिन्यांच्या दीर्घ ब्रेकमध्ये स्वतःच्या उणिवांवर लक्ष केंद्रित करता आले. त्यामुळे भविष्यात निश्चितच कामगिरी सुधारण्यासाठी याचा फायदा होणार असल्याची प्रांजळ कबुली आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू मुग्धा आग्रे हिने दिली.

कोरोनाकाळ खेळाडूंसाठी खूपच कठीण गेला. लॉकडाउनमुळे सुरुवातीला प्रॅक्टिस पूर्णपणे बंद होती. त्यामुळे नाईलाजाने घरीच सराव करावा लागला. काही दिवस टेरेसवर स्कीपिंग व हलका व्यायाम करून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने घराच्या समोर छोटंसं मैदान होतं. त्यामुळे रोज पहाटे उठून तिथे एकटीच रनिंग व फिटनेस करायची. अनलॉक झाल्यानंतर मात्र नियमित सरावाला सुरुवात झाली. परंतु एक मोठा कालावधी नियमित सरावाविना गेल्याचा फटकाही बसला. 

त्याचवेळी या ब्रेकचा थोडाफार फायदाही झाला. उल्लेखनीय म्हणजे उणिवांवर लक्ष केंद्रित करून त्यावर कसून मेहनत घेता आली. राज्य सरकारने अलीकडेच इनडोअर खेळांना हिरवी झेंडी दाखविली असली, अजूनही पाहिजे तशी गाडी रुळावर आलेली नाही. सराव करताना मनात सारखी धाकधूक असते. त्यामुळे पूर्वीसारखं तणावमुक्त राहून सराव करणे शक्य होत नाही. येत्या काही दिवसांत परिस्थिती नॉर्मल होईल, अशी आशा करते.

झाले गेले विसरून आता भविष्याकडे पाहणार आहे. स्पर्धा नेमक्या कोणत्या आणि कुठे होणार आहे, याबद्दल माहिती नाही. घोषणा झाल्यावर नक्कीच तयारीला लागेल. खेळाडूंसाठी पुढचा काळ खूप महत्त्वाचा राहणार आहे. लांबलचक ब्रेकनंतर अचानक  स्पर्धेत उतरून चांगली कामगिरी करणे सोपे नाही, याची अर्थातच मलादेखील कल्पना आहे. पण मी मानसिक तयारी केलेली आहे. दुप्पट मेहनत घ्यावी लागणार आहे. गेल्या सात वर्षांपासून जीबी वर्गीस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या मुग्धाचे यापुढील लक्ष्य २०२२ मध्ये होणारी राष्ट्रकुल स्पर्धा आहे. त्या दृष्टीने तिची सध्या मेहनत सुरू आहे. याशिवाय २०२४ साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्येही देशाला पदक मिळवून देण्याची इच्छा तिने बोलून दाखविली.

भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या रँकिंगमध्ये बाराव्या स्थानावर असलेल्या २१ वर्षीय मुग्धाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आतापर्यंत अनेक पदके जिंकली आहेत. २०१७ मध्ये लागोस येथील आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धेत रौप्यपदक, गतवर्षी घाना येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक आणि टाटा ओपन व बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धेत ब्रॉंझपदके तिची आतापर्यंतची कमाई आहे. याशिवाय भारत व कोरिया येथे झालेल्या सुपर सीरिजसह स्पेनमध्ये झालेल्या स्पर्धेतही तिने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

'कोरोनामुळे सरावावर विपरित झाला असला तरी, दीर्घ ब्रेकचा फायदाही झाला. या निमित्ताने स्वतःच्या उणिवांवर लक्ष केंद्रित करून त्यावर मेहनत घेता आली. त्यामुळे भविष्यात निश्चितच कामगिरी सुधारण्याला मदत होणार आहे. '
-मुग्धा आग्रे, 
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com