प्रेमात मुख्याध्यापक शिक्षकाने फसवणूक केली, युवतीने उचलले टोकाचे पाऊल

संदीप गौरखेडे
Wednesday, 4 November 2020

गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदावर कार्यरत शिक्षकाने या युवतीला नोकरी आणि लग्नाचे आमिष  दाखवीत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. युवतीने लग्नाचा तगादा लावल्यावर त्याने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने घरीच विष प्राशन केले.

कोदामेंढी(जि.नागपूर) : लग्नाचे आणि नोकरीचे आमिष दाखवून वर्षभरापासून एक शिक्षक युवतीचे शारीरिक शोषण केले. युवतीने लग्नाची मागणी केली असता त्याने नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या अठरा वर्षीय युवतीने आत्महत्या केली.  

गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदावर कार्यरत शिक्षकाने या युवतीला नोकरी आणि लग्नाचे आमिष  दाखवीत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. युवतीने लग्नाचा तगादा लावल्यावर त्याने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने घरीच विष प्राशन केले. मुलीची प्रकृती खालावलेली पाहून घरच्यांनी भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह निघाल्याने तिचा मृतदेहदेखील कुटुंबीयांना मिळू शकला नाही.

अधिक वाचाः शेतात पिकलं तर आमच्या पोटात जाईल, पण संपूर्ण पिकच पाण्यात गेलं तर जगून करायचं काय?

पोलिस शिक्षकाच्या शोधात
मौदा तालुक्यातील ढोलमारा येथील जि.प. शाळेतील मुख्याध्यापक असलेल्या या शिक्षकाचे नाव जीवन तानुजी सलामे (वय ४२) आहे. तीन वर्षांपासून तो तेथील शाळेत कार्यरत होता. त्याला पत्नी, एक अठरा वर्षीय मुलगी आणि एक मुलगा असल्याचे कळते. रामटेक येथे किरायाने राहून तो ढोलमारा येथे ‘अपडाऊन’ करायचा. युवतीने आत्महत्या केल्याचे कळताच तो पसार झाला. याप्रकरणी अरोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते शिक्षकाचा शोध घेत आहेत. शिक्षक मूळचा गोंदिया जिल्ह्यातल देवरी तालुक्यातील रा. वांढरा पो. चिचगढ येथील आहे. पोलिसांचे पथक आरोपी शिक्षकाच्या शोधात त्याच्या मूळ गावी गेले, मात्र तो सापडला नाही. त्याच्या पत्नीला अरोली पोलिस ठाण्यात हजर राहण्याबाबत सूचना देण्यात आली. पोलिसांनी  शिक्षकाच्या गुन्ह्यासंबंधी शिक्षण विभागाला कळविले आहे.

अधिक वाचाः विवाहितेची कमाल !जीवंत पतीला मृत दाखवून लाटले शासकीय अनुदान अन् केले दुसरे लग्न
 

सासूरवाडीला पाठविले पथक
पहिल्या दिवसापासून आरोपी शिक्षकाचा शोध सुरु आहे. रामटेक आणि त्याच्या मूळ राहत्या गावी तसेच सासूरवाडीला पथक पाठविले होते. पण तो कोठेही आढळून आला नाही. तो नक्षलग्रस्त भागात दडून असावा, असा अंदाज आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून शोध सुरू आहे. याबाबत शिक्षण विभागाला देखील कळविले आहे.
विवेक सोनवणे
ठाणेदार अरोली

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In love the headmaster cheated on the teacher, the young woman took the extreme step