खेल खेल में प्यार हो गया... हिस्लॉप कॉलेजच्या ग्राऊंडवर फुलले प्रेम

lalita-inder
lalita-inder

नागपूर : खेळाच्या मैदानावर सकाळ-संध्याकाळ सराव करीत असताना त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पाहता-पाहता धडाक्‍यात लग्नाचा बारही उडवून टाकला. ही प्रेमकहाणी आहे शहरातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉलपटू इंदरजितसिंग रंधावा व ललिता अवचट यांची.
साधारणपणे 1991-92 मधील ही गोष्ट आहे. त्या वेळी इंदर हा जरीपटका येथील सिंधू महाविद्यालयात शिकत होता. तर, ललिता ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. दोघेही हॅण्डबॉल खेळत असल्याने साहजिकच स्पर्धा, सराव व शिबिरांच्या निमित्ताने ते नियमितपणे भेटायचे. हिस्लॉप मैदानावर सराव करीत असताना त्यांच्यात मैत्री झाली. या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. ललिताचे दोनवेळा कॉलेज बदलले; परंतु त्यांच्यातील मैत्री कमी झाली नाही. उलट, मैत्रीचा धागा आणखीनच घट्ट होत गेला.

महिन्यांमागून महिने आणि वर्षांमागून वर्षे उलटल्यानंतर एके दिवशी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलगा दुसऱ्या धर्माचा (शीख) असल्यामुळे सुरुवातीला ललिताच्या आईचा लग्नाला विरोध होता. परंतु, इंदरच्या आर्मी ऑफिसर असलेल्या वडिलांनी तिच्या आईचे मन वळविल्यानंतर दोघांचा जानेवारी 1995 मध्ये थाटात पंजाबी पद्धतीने विवाह पार पडला.आणि ललिता अवचट लवलिनकौर रंधावा झाली.
लग्नाच्या 25 वर्षांनंतर दोघेही संसारात खुश आहेत. लवलिननेही लग्नानंतर पंजाबी ढंग आत्मसात करून कुटुंबात स्वत:ला सामावून घेतले. इंदर व लवलिनला दोन मुले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, मुलांनाही त्यांनी हॅण्डबॉलपटू बनविले. लेफ्टनंट होऊ घातलेला थोरला मनप्रीतसिंग सध्या चेन्नई येथे ट्रेनिंगला आहे. तर, धाकटा हरप्रीत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करतो आहे. भोतमांगे परिवारानंतर हॅण्डबॉल खेळणारे रंधावा कुटुंब नागपुरातील एकमेव आहे. इंदर व ललिताने उमेदीच्या काळात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धा गाजविल्या. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी देशाचे नेतृत्व केले. आता दोघेही युवा खेळाडूंना प्रशिक्षण देऊन भावी पिढी घडवीत आहेत. इंदर सध्या जी. एच. रायसोनी कॉलेजमध्ये क्रीडाधिकारी असून, लवलिन हिंगणा येथील केंद्रीय विद्यालयात क्रीडा शिक्षिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com