
बेशिस्त वाहनचालकांवरील दंड वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची मोठी समस्या असल्याचे नमुद करीत ते म्हणाले, रस्ते अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शनपर फिल्मसाठी केव्हाही तयार आहे.
नागपूर : ‘ऑस्ट्रेलियात एका कार्यक्रमासाठी गेलो असताना तेथील रस्त्यावर एकही खड्डा नसल्याने आश्चर्य वाटले. याबाबत विचारले तर सोबतच असलेले भारतीय अभियंते विजय जोशी यांनीच ते रस्ते तयार केल्याचे सांगितले. भारतात असे रस्ते का तयार करीत नाही, असा प्रश्न केला असता त्यांनी भारतात रस्ते इंजिनिअर नव्हे तर राजकारणी बांधतात असे उत्तर दिले’, असा किस्सा अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ऐकविला अन् सभागृहात हशा पिकला. मात्र, गेल्या दहा वर्षांत चित्र बदलल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात रस्ते सुरक्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने देण्यात आलेल्या सिनेमॅटिक स्क्रिनचे लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. रस्ते सुरक्षेसंबंधी प्रमुख कार्यक्रम असल्याने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी रस्त्यावरील वाहनचालकांच्या बेशिस्तीवरही ताशेरे ओढले. गेल्या दहा वर्षांत रस्त्यांची स्थिती केंद्रीयमंत्री गडकरी यांच्यामुळे बदलल्याचे ते म्हणाले.
बेशिस्त वाहनचालकांवरील दंड वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची मोठी समस्या असल्याचे नमुद करीत ते म्हणाले, रस्ते अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शनपर फिल्मसाठी केव्हाही तयार आहे. दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर पाचपट दंड आकारल्यास ते सावध होतील व अपघात टळण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
सुरेश भट सभागृहात सिनेमॅटिक स्क्रीन लावल्यामुळे सभागृहाचे नाट्यचित्रपटगृहात रूपांतर झाले आहे, ही बाब कलावंतांसाठी अतिशय आनंदाची आहे. राज्यातील इतरही नाट्यगृहांमध्येही असा स्क्रीन लावला तर मराठी चित्रपटांचे प्रदर्शनदेखील तेथे करता येईल. मराठी चित्रपटसृष्टीला अशा नाट्यचित्रपटगृहांनी अतिशय गरज असल्याचेही मकरंद अनासपुरे म्हणाले.
सुरेश भट सभागृहात लावण्यात आलेल्या भव्य सिनेकॅटिक स्क्रीनचा शिक्षण, मनोरंजन व विज्ञान-तंत्रज्ञानाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी होईल. विद्यार्थी, महिला, शेतकरी बांधव, युवा वर्गाला या सिनेमॅटिक स्क्रीनचा अधिकाधिक लाभ कसा होईल, याकडे मनपाने लक्ष दिले पाहिजे, असे यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले.