"मम्मी पापा यू टू'

clean nagpur.jpg
clean nagpur.jpg

नागपूर : कुणावर जबरदस्ती केल्याने शहर स्वच्छ होऊ शकत नाही. हा मानसिकतेचा भाग आहे. माझे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मी पुढाकार घेईन. माझ्या सवयी बदलेन, असे सर्वांनी ठरविले तर नागपूर शहर स्वच्छ होण्यास कुणीही अडथळा आणू शकणार नाही. मानसिकता बदलण्याचे हेच कार्य विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून "मम्मी पापा यू टू' अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शाळांच्या मुख्याध्यापकांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या शहरासाठी सर्वांनी या अभियानात "बेस्ट' देण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

महानगरपालिका, शालेय शिक्षण विभाग आणि नागपूर वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून "मम्मी पापा यू टू' हे अभियान हाती घेण्यात आले आहे. 13 ते 19 जानेवारी दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून घरातील मोठ्यांच्या स्वच्छता आणि वाहतूक नियमांबाबत असलेल्या वाईट सवयी बदलविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धांमधून मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी याकरिता शाळांतील मुख्याध्यापकांच्या सुरेश भट सभागृहात आज कार्यशाळा घेण्यात आली. मंचावर महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, आयुक्त अभिजित बांगर, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या जुही पांढरीपांडे, शिक्षण उपनिरीक्षक चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंजारी, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) राठोड, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) झोडे उपस्थित होते.

महापौर म्हणाले, मी जलप्रदाय समितीचा सभापती असताना दाढी करताना नळ सुरू ठेवला. माझ्या मुलीने मला पाणी वाया जात असल्याबाबत टोकले. तेव्हा माझ्या लक्षात आले की आपण गावभर पाणी बचतीसंदर्भात सांगत असतो आणि आपणच ते वाया घालवतो. विद्यार्थी असलेल्या माझ्या मुलीला जर हे कळते तर मला का नाही? हे एक उदाहरण आहे. विद्यार्थ्यांना आपल्यामुळे लाज वाटू नये, किमान आपल्या पुढल्या पिढीने आपल्या चांगल्या सवयीचे अनुकरण करायला हवे, यासाठी आपल्यालाच आता बदलण्याची गरज आहे.

महत्त्वाकांक्षी अभियान
महानगरपालिकेच्या इतिहासात स्वच्छतेसाठी लोकांना सहभागी करून घेण्यासाठी राबविण्यात आलेले हे सर्वांत मोठे अभियान आहे. महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा स्वच्छ भारत अभियानात क्रमांक एकवर येण्यासाठी प्रयत्नरत आहे. लोकसहभाग वाढला तर त्यात काहीही अडचण नाही. यासाठीच हे अभियान महत्त्वाकांक्षी असल्याचे आयुक्त अभिजित बांगर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com