
नागपुरातील लक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या एका स्त्रीला तिच्या दुर्बलतेचा आणि आजाराचा फायदा घेत एका व्यक्तीने तिची फसवणूक केली आहे. वयाने मोठया असलेल्या या महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैशांसाठी तिच्याशी त्याने लग्न केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
नागपूर: लग्न म्हणजे दोन जीवांचेच नाही तर दोन मनांचे मिलन असे म्हणतात. एकदा जोडीदारावर प्रेम जडले की त्यांची जात ,धर्म, राहणीमान, आर्थिक परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती या सर्व गोष्टी महत्वाच्या राहत नाही. लग्नाच्या पवित्र नात्याला मरेपर्यंत निभवतात. पण सगळ्यांच्याच नशिबात हे सुख असते असे नाही. लग्नाच्या पवित्र नात्याचा बाजार मांडून ठेवणारेही या जगात आहेत. असाच एक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.
नागपुरातील लक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या एका स्त्रीला तिच्या दुर्बलतेचा आणि आजाराचा फायदा घेत एका व्यक्तीने तिची फसवणूक केली आहे. वयाने मोठया असलेल्या या महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैशांसाठी तिच्याशी त्याने लग्न केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका राजेशकुमार सिंग (46, रा. प्रतिभा अपार्टमेंट, वानखेडे ग्राऊंडजवळ, भोरलिंगे लेआऊट, लक्ष्मीनगर) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. आरोपीने महिलेकडील 1 कोटी रुपये हडपण्यासाठी तिच्याशी मंदिरात लग्न केले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पती राजेशकुमार तारकेश्वर सिंग (40, रा. सततारका पॅलेस, दुर्गा मंदिरजवळ, गाव आरमंडे, रांची, झारखंड) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेसोबत लग्न केल्यानंतर आरोपीने तिचे पैसे आणि मालमत्ता हडपली. त्याचबरोबर लगेच दुसरे लग्न करीत पत्नीची फसवणूक केली. राची येथे दुसऱ्या युवतीशी लग्न केले. अशाप्रकारे महिलेच्या शारीरीक व दुर्बलतेसह आजाराचा गैरफायदा घेत वेळोवेळी आर्थिक फसवणूक केली.
दरम्यान फिर्यादीच्या आईचा विश्वास संपादन करुन स्थावर मालमत्ता बळकावण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडून मृत्युपत्राचा लेख लिहुन घेतला. यात रेणूका यांच्या भावाचा उल्लेख करण्याचे हेतुपुस्सर टाळले. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
संपादन - अथर्व महांकाळ