तीन दिवसांत तिसऱ्यांदा हादरले नागपूर, चौघांकडून चहाविक्रेत्याचा खून

अनिल कांबळे
Wednesday, 13 January 2021

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात मंगळवारला बाजार भरते. गोलू हा बाजारात चहाचा ठेला लावायचा, तर आरोपींचे भाजीपाल्याचे दुकान आहे. आरोपीसुद्धा मंगळवारी बाजारात दुकान लावतात.

नागपूर : बाजारात दुकान लावण्याच्या क्षुल्लक वादातून चौघांनी चाकू आणि तलवारीने भोसकून चहाविक्रेत्याचा निर्घृण खून केला. ही थरारक घटना आज सायंकाळी सहा वाजता सदरमधील मंगळवारी बाजारात घडली. गोलू उर्फ अक्षय निर्मळे (वय ३०, रा. मस्कासाथ) असे खून झालेल्या चहाविक्रेत्याचे नाव आहे, तर राजू मोहनलाल वर्मा, गुड्डू वर्मा, रितेश वर्मा आणि निखिल वर्मा (सर्व रा. कळमना) असे हत्याकांडातील आरोपीचे नाव आहे. गेल्या तीन दिवसांतील हे तिसरे हत्याकांड आहे. अजनी आणि यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही हत्याकांडाच्या घटना समोर आल्या होत्या. 

हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात मंगळवारला बाजार भरते. गोलू हा बाजारात चहाचा ठेला लावायचा, तर आरोपींचे भाजीपाल्याचे दुकान आहे. आरोपीसुद्धा मंगळवारी बाजारात दुकान लावतात. मंगळवारी गोलूने आरोपींच्या दुकानासमोरच चहाविक्रीचा ठेला लावला. आरोपींनी दुकानासमोर ठेला लावण्यास विरोध केला, तर गोलूने ठेला हटविण्यास नकार दिला. दुकान लावण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या भांडणातून दोघांमध्ये मारहाण सुरू झाली व आरोपींनी संगनमताने चाकूने भोसकले. ही घटना संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मंगळवारी बाजारात व्यवसाय करण्याच्या वादातून ही दुसरी घडली आहे. 

हेही वाचा - लग्नानंतरच दीड वर्षात झाले पतीचे निधन, तरीही खिचडी शिजविली तिथेच गाठले नगराध्यक्षपद

यापूर्वी दुकानदाराकडून बाजार शुल्क वसूल करण्यावरून एकाचा खून करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विनिता शाहु, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्यासह सदर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला व आरोपींचा शोध सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man murdered in mangalwari market of nagpur crime news