Success Story: आता कोरोनावर मात करणार 'ओझोनेटर'; तरुणाने बनवलेल्या यंत्राचे ‘एम्स'नेही केले कौतुक

Man from Nagpur made Ozonator for vanishing corona virus
Man from Nagpur made Ozonator for vanishing corona virus

नागपूर ः कोरोना प्रभाव कमी झाला असला तरी अजूनही मोठ्या संख्येने दररोज बाधित आढळून येत आहे. त्याचवेळी बाजार, हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये गर्दीही वाढली आहे. गर्दी वाढल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला आहे. मात्र या गर्दीवर कोरोनाचा प्रभाव होऊ नये, यासाठी शहरातील तरुणाने ओझोनेटर तयार केले. विशेष म्हणजे तरुणाने विविध ठिकाणी ते वापरण्यास दिल्यानंतर त्याची विक्रीही सुरू केली. त्याच्या या ओझोनेटरला परदेशातूनही मागणी आहे.

सर्व जगाला कवेत घेणाऱ्या कोरोनाच्या आव्हानावर मात करण्यासाठी प्रत्येक लसीसंदर्भात वेगवेगळे प्रयोग सुरू आहे. लस दृष्टीपथात असली तरी कोरोनाच्या काळात नागपुरातील असद हसन या एमएससी एन्व्हायर्मेंट करीत असलेल्या तरुणानेही कोरोना विषाणूवर नियंत्रणासाठी परंपरागत ओझोनवर आधारित एअर प्युरिफायर तयार केले. नागपुरातील काही डॉक्टरांकडे ते लावण्यात आले. 

त्यांनीही ओझोनच्या तीव्रतेने कोरोनाचा विषाणू दूर ठेवण्यास मदत होत असल्याची पावती दिली. या तरुणाला काकाच्या परंपरागत ओझोनेटर्स तयार करण्याच्या व्यवसायातून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मार्ग सापडला. गुजरातमध्ये काकाकडे काही दिवस राहून ओझोनेटर्स कसे तयार करतात, याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी सुधारणा करण्यासाठी जगभरातील ओझोनबाबतचे संशोधन, त्याचा वापराबाबतचे दस्तऐवज चाळले. कोरोना विषाणूचा अभ्यास केला. देश-विदेशातील कोव्हीड काळात सुरू असलेले तंत्रज्ञान, त्याच्या अहवालाचे वाचन केले. 

या अभ्यासअंती त्याने नवेच ओझोनेटर तयार केले. कोरोना विषाणूवर नियंत्रणासाठी त्याने ओझोनेटरमध्ये ओझोन सेल क्वालिटी वाढविली. परंपरागत सर्किट बोर्ड काढून नवीन तीव्रतेचा सर्किट बोर्ड तसेच ट्रान्सफॉर्मरच्या दर्जात सुधारणा केली. पूर्णपणे भारतीय साधनांचा वापर करण्यात आला असून यावर दोन लाख रुपये खर्च झाल्याचे असद हसनने नमुद केले.

सर्वच ठिकाणाहून कौतुक

शहरातील काही डॉक्टरने त्याला त्यांच्या कक्षात ओझोनेटर बसविण्यासाठी आमंत्रित केले. यात अमरावती जिल्ह्यातील अचलपूरच्या हॉस्पिटलचाही समावेश आहे. त्याने शहरातील एम्सचेही दरवाजे ठोठावले. तेथील प्रशासनाने लॅबमध्ये लावण्याची परवानगी दिली. या सर्व ठिकाणी ओझोनेटर लावण्यापूर्वी तसेच ओझोनेटर लावल्यानंतरच्या स्थितीचा अहवाल तयार करण्यात आला. यात संसर्ग पसरविणारे बॅक्टेरिया कमी झाल्याचे आढळून आल्याचे असद हसनने सांगितले. एम्सने तर त्याला पत्र देऊन ओझोनेटरचे कौतुक केले. एवढेच नव्हे पोलिस विभागानेही असदला डेमोसाठी आमंत्रित केले.
बॉक्स..

विदेशातूनही ऑर्डर

सध्या ऑनलाईन खरेदी विक्रीचा ट्रेंड आहे. त्यामुळे असदने स्वतःची वेबसाईट सुरू केली आणि हे ओझोनेटर त्याने त्यावर टाकले. इंडिया मार्टवरही विक्रीसाठी ओझोनेटर टाकण्यात आले. या ओझोनेटरला तुर्की, हंगेरीतूनही मागणी आली. एका ओझोनेटरची किंमत २६ हजार असून जीएसटीसह ते ३२ हजारापर्यंत आहे. त्याची वार्षिक उलाढाल सध्या २० लाख आहे. सध्या मिशन बिगिन अगेनअंतर्गत हॉटेल, रेस्टॉरंटही सुरू झाले आहेत. यामुळे येथेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढत आहे.

असा संपतो कोरोनाचा विषाणू

कोरोनाचा विषाणू टेबल आदीच्या पृष्ठभागावर असतो. त्याचप्रमाणे वातावरणात असलेल्या हजारो सुक्ष्मकणाच्या पृष्ठभागावरून त्याचा प्रसार होऊ शकतो. जेथे ओझोनेटर लावले आहेत, तेथे कोव्हीड विषाणूचा प्रसार होत नसल्याचा दावा असदने केला. विषाणूच्या डीएनएभोवती एक आवरण असते. ओझोन ते आवरणाला ऑक्सीडाईज्ड करून ब्रेक करते. त्यामुळे कोव्हीड विषाणूचा प्रसार रोखता येणे शक्य असल्याचे असदने सांगितले. याबाबत देशविदेशातील विविध अहवाल वाचल्यानंतर ही प्रक्रिया कळली. त्यातूनच नव्या ओझोनेटरचा जन्म झाल्याचे तो म्हणाला.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com