"साहेब, माफ करा चूक झाली"! माजी नगराध्यक्षांना लाच देणाऱ्याने मागितली जाहीर माफी 

विजय वानखेडे
Tuesday, 20 October 2020

या आकस्मिक स्थिती व मागणीने झाडे कुटुंबीय अचंबित झाले. त्यामुळे झाडे परिवारातील सर्वांनी मिळून निर्णय घेत तक्रारकर्ते संजय कृष्णराव खोडे, भाऊ मेघराज खोडे, आई शोभा, बहीण सुवर्णा भिसे (रा.बिडीपेठ,नागपूर) या सर्वांना घेऊन वाडी पोलिस ठाणे गाठले.

वाडी (जि. नागपूर) : मागील वर्षी वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना त्यांच्या प्रत्यक्ष घरी लाच देऊन लाचलुचपत खात्याकडून अटक कार्यवाही घडवून आणणारे संजय कृष्णराव खोडे हे कुटुंबीयांसह सोमवारी सकाळी अचानक झाडे यांच्या घरी पोहचले. माझ्या हातून चूक झाली व झालेल्या प्रकाराबद्दल चक्क माफी देण्याची विनंती केली. या प्रकरणात अचानक आलेल्या वळणाने वाडीत सर्वत्र खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना उत आला आहे. 

या आकस्मिक स्थिती व मागणीने झाडे कुटुंबीय अचंबित झाले. त्यामुळे झाडे परिवारातील सर्वांनी मिळून निर्णय घेत तक्रारकर्ते संजय कृष्णराव खोडे, भाऊ मेघराज खोडे, आई शोभा, बहीण सुवर्णा भिसे (रा.बिडीपेठ,नागपूर) या सर्वांना घेऊन वाडी पोलिस ठाणे गाठले. उपस्थित पोलिस निरीक्षक राजेंद्र पाठक यांना झाडे यांनी घडलेली पूर्ण हकिकत सांगितली. तक्रारकर्ते संजय खोडे यांनी, माझ्या हातून चूक झाली असून मी लेखी व मौखिक माफी मागत आहे. माझी तक्रार मी मागे घेत असल्याचे सांगितले. 

सविस्तर वाचा - चाळीसचे फेडले ८५ लाख; तरी सावकार करायचा १३ लाखांची मागणी; त्रास असह्य झाल्याने घेतला गळफास

यावेळी उपस्थित पोलिस निरीक्षक राजेंद्र पाठक यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. हे प्रकरण त्यांच्या त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरील व न्यायप्रविष्ट असल्याने संबधित विभागाकडे संपर्क व मार्गदर्शन घेण्याची त्यांना सूचना केली. बाहेर पोलिस ठाण्याच्या आवारात त्यांनी प्रसार माध्यमांसमोर हीच कथा प्रस्तुत करून दिशाभूल झाल्याने ही कार्यवाही केल्याचे सांगून माफी व तक्रार मागे घेत असल्याचे सांगितले. मात्र कुणाचा दबाव होता, हे सांगण्यास त्यांनी टाळाटाळ केली. 

त्यानंतर त्यांनी लाचलुचपत विभागाच्या नावाने एक पत्र लिहून वस्तुस्थिती कथन करीत प्रेम झाडे हे या प्रकरणात निर्दोष असल्याचे सांगत कुणाचाही दबाव नसल्याचे सांगून स्वमर्जीने ही तक्रार मागे घेत असल्याचे सर्व कुटुंबीयांच्या सहीचे पत्र जारी केले. त्याची एक प्रत वाडीचे पोलिस निरीक्षक यांनाही माहितीसाठी दिल्याचे समजते. यावेळी उपस्थित प्रेम झाडे व परिवाराने याबाबत प्रतिक्रियेत सांगितले की तक्रारकर्त्याला आपली चूक उमगली व सहपरिवार माफी मागितल्याने मानविय आधारावर आम्ही त्यांना क्षमा केले. परंतू या प्रकरणात जो मला व माझ्या परिवाराला नाहक त्रास झाला, राजकीय, सामाजिक बदनामी व नुकसान झाले, ते कसे भरून निघणार? 

जाणून घ्या - हृदयद्रावक! आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून ४ वर्षांच्या मुलासह बापाचा महामार्गावर टाहो

याबाबत क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांच्याशी संपर्क करून घडलेली हकिकत कथन करून प्रतिक्रिया विचारली असता या लाचलुचपत प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी असे का केले, याबद्दल ते सांगू शकत नाही. माहिती व चौकशी झाली तर सत्य कळेल असे मत व्यक्त केले. एकूणच या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे वाडीसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेचा विषय ठरणार असे दिसते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man who did corruption in wadi said sorry publicly