न्यायालयाचीही फसवणूक! मंगेश कडवने चालकाच्या स्वाक्षरीचे दस्तऐवज केले सादर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

मंगेश कडव याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. नोटरी व प्रतिज्ञापत्रावर कडव याने स्वत:ची स्वाक्षरी न करता चालकाची स्वाक्षरी केली.

नागपूर : खंडणी, फसवणूक व घरावर ताबा मिळविल्याप्रकरणात गुन्हे दाखल असलेला व शिवसेनेच्या शहर प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलेला मंगेश कडव याने बनावट दस्तऐवज सादर करून न्यायालयाचीही फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती आहे.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

याप्रकरणातही आता कडवविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्‍यता आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर फरार असलेल्या कडव याच्या अटकेसाठी गुन्हेशाखेच्या खंडणीविरोधी पथकाने नागपूरसह पाच ठिकाणी छापे टाकले. मात्र कडव हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचा शहर प्रमुख मंगेश कडव याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. नोटरी व प्रतिज्ञापत्रावर कडव याने स्वत:ची स्वाक्षरी न करता चालकाची स्वाक्षरी केली. चालकाच्या स्वाक्षरीचे दस्तऐवज त्याने न्यायालयात सादर केले. गुन्हेशाखा पोलिसांनी न्यायालयाला ही बाब लक्षात आणून दिली.

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!  

कडव हा फरार आहे. फरार असताना त्याने जामिनासाठी सादर केलेल्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करणे शक्‍य नाही. कडव याच्या जागी त्याच्या चालकाने स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात कडव याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली आहे. कडव याच्या ऐवजी स्वाक्षरी करणा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कडव याचा भाऊ समीर कडव याच्या सांगण्यावरून जामिनासाठी सादर केलेल्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले.

या वृत्ताला पोलिस अधिकाऱ्यांनाही दुजोरा दिला आहे. कडव याच्या शोधासाठी गुन्हेशाखा पोलिसांनी नागपूरसह मौदा, सावनेर, बुटीबोरी व भंडारा येथे छापे टाकले. या ठिकाणी कडव हा पोलिसांना आढळून आला नाही. तो भूमिगत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून, त्याच्या अटकेनंतर पक्षातील अन्य नेतेही अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangesh Kadav cheated the court