राजेंद्र जैन राष्ट्रवादीचे निरीक्षक! शहर कार्यकारिणीत फेरबदलाचे संकेत, शहराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

राजेश चरपे
बुधवार, 15 जुलै 2020

जैन यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादीची शहर कार्यकारिणीसुद्धा बदलण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीतर्फे नव्या शहर अध्यक्षांची शोधाशोध सुरू आहे. अहीरकर यांच्या कार्यशैलीवरून मध्यंतरी बरेच वाद निर्माण झाले होते.

नागपूर : गोंदियाचे माजी आमदार आणि माजी केंद्रीयमंत्री प्रफुल पटेल यांचे कट्टर समर्थक राजेंद्र जैन यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नागपूर जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जैन यांच्या नियुक्तीमुळे शहराची कार्यकारिणी बदलणार अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. एका आंदोलक नेत्याला पक्षात घेऊन त्याच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ टाकली जाणार असल्याची जोरदार चर्चा राष्ट्रवादीत सुरू आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी जैन यांचे अभिनंदन केले असून लवकरच पक्षाची आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले. जैन यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादीची शहर कार्यकारिणीसुद्धा बदलण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीतर्फे नव्या शहर अध्यक्षांची शोधाशोध सुरू आहे. अहीरकर यांच्या कार्यशैलीवरून मध्यंतरी बरेच वाद निर्माण झाले होते.

राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांनी अहीरकर यांना हटविण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक असल्याने त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. आता राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्याने अनेकजण अध्यक्ष बनण्यास इच्छुक आहेत. हे लक्षात घेता अहीरकर विरोधी गट पुन्हा सक्रीय होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

शहरातील एका आंदोलक नेत्याला राष्ट्रवादीने अध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. त्यांच्याशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. जैन यांची निरीक्षक म्हणून अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली असल्याने अध्यक्ष बदलाची प्रक्रियासुद्धा वेगवान होणार असल्याचे बोलले जात आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many changes expected in Nagpur NCP Executive body