Big News : ‘मराठा आरक्षण’ प्रवेशाबाबत उदय सामंत यांचे मोठे वक्तव्य; काय म्हणाले ते वाचा

राजेश चरपे
Tuesday, 15 September 2020

परीक्षेत मार्चपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित पेपर घेण्यात येणार आहेत. बहुपर्यायी ऑनलाइन परीक्षेसाठी ९० ते ९२ टक्के विद्यार्थी सज्ज झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनी परीक्षा कशा पद्धतीने घ्यावी यावर विचार सुरू आहे. तसेच जे विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण होतील त्यांची येत्या एक ते दीड महिन्यात पुन्हा याच पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे, असे उदय सामंत म्हणाले.

नागपूर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना मराठा आरक्षणाबाबत आठवडाभरात सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परीक्षा घेण्यात येत आहे. मी वैयक्तिकरीत्या परीक्षा घेण्याच्या विरोधात आहे. नागपूर विद्यापीठाने आगळा-वेगळा एमसीक्यू पर्याय दिला आहे. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना एक तासाचा पेपर देण्यात येणार असून, प्रश्नपत्रिकेत ५० बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश आहे.

हेही वाचा - जन्मठेप म्हणजे किती वर्षांची शिक्षा? आजीवन कारावास की १४ वर्ष? वाचा सविस्तर

यापैकी २५ प्रश्न सोडवावे लागणार आहे. या परीक्षेत मार्चपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित पेपर घेण्यात येणार आहेत. बहुपर्यायी ऑनलाइन परीक्षेसाठी ९० ते ९२ टक्के विद्यार्थी सज्ज झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनी परीक्षा कशा पद्धतीने घ्यावी यावर विचार सुरू आहे. तसेच जे विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण होतील त्यांची येत्या एक ते दीड महिन्यात पुन्हा याच पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे, असे उदय सामंत म्हणाले.

पदवीला धोका निर्माण होणार नाही

आयआयटीने परीक्षा रद्द केली. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश सरकारने परीक्षा रद्द केल्यात. त्यावर कुणीच चर्चा करीत नाही. कोरोना काळात होणारी परीक्षापद्धती ग्राह्य धरली जाणार आहे. विद्यार्थी भविष्यात कुठेही नोकरीसाठी गेल्यास त्यांच्या पदवीला धोका निर्माण होणार नाही, असेही सामंत यांनी दिले. उदय सामंत यांनी परीक्षेसंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आढावा बैठक घेतली. यावेळी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, माजी आमदार प्रकाश गजभिये, कुलसचिव डॉ. निरज खटी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी - बारा दिवसांची चिमुकली गंभीर आजाराने ग्रासलेली अन् घरात अठरा विश्व दारिद्र्य, मग काय करणार ते मायबाप

ऑनलाइन सल्ला देणाऱ्यांकडून प्रशंसा

राज्य सरकारने सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत त्यांना पदवी देण्याचे ठरविले होते. याला विरोध झाला. काहींनी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवरून ऑनलाइन सल्ले दिले. त्यांनी आपल्या निर्णयाची प्रत्यक्ष भेटल्यानंतर प्रशंसा केली असल्याचे सामंत म्हणाले.

शतकोत्तर वर्षात शिक्षण विभाग नागपुरात

नागपूर विद्यापीठाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. यावेळी मंत्रालयाच्या शिक्षण विभागातील अधिकारी नागपूरला हजर राहतील. स्वतःही येणार असून विद्यापीठाला सर्व सहकार्य करणार असल्याची ग्वाही उदय सामंत यांनी दिली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Reservation will decide on admission within a week