भर रस्त्यावर आणला बाजार, लोकहो! आता बोला काय करायचे?

पुरूषोत्तम डोरले
Thursday, 22 October 2020

मौदा शहराला लागून लहान मोठ्या सुमारे १० कंपनी आहेत. रस्त्यावर सायंकाळी ४ वाजेपासून नेहमी गर्दी दिसते. याच रस्त्यावरून नागपूरकडे जाणारी मोठी वाहनेही जातात त्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे नगरपंचयतचे मात्र संपूर्ण दूर्लक्ष आहे.

मौदा(जि.नागपूर): मौदा नगरपंचायत हद्दीतील दैनंदिन बाजार व आठवडी बाजार शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भरत असल्यामुळे जनतेला रहदारीकरिता नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाजाराची जागा शिवाजी हायस्कुल जवळ गुजर वाडा येथे देण्यात आली आहे. परंतु तेथे कोणतेही  दुकान लागत नाही. काही दिवस तेली समाज भवन जवळ चक्रधरनगर रोड व केसलापूर रोडवर बाजार भरत होता. तेथून आज चक्क मौदा चक्रधर गेट पासून ते पोलिस स्टेशनपर्यंत भरत आहे. बाजाराची नेमकी जागा कोणती आहे हे कोणालाच कळत नाही. यात नगरपंचायत प्रशासन डोळेझाक करीत आहे. मौदा शहराला लागून लहान मोठ्या सुमारे १० कंपनी आहेत. रस्त्यावर सायंकाळी ४ वाजेपासून नेहमी गर्दी दिसते. याच रस्त्यावरून नागपूरकडे जाणारी मोठी वाहनेही जातात त्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे नगरपंचयतचे मात्र संपूर्ण दूर्लक्ष आहे.

हेही वाचाः हे काय आणखी वाढलंय पुढ्यात? रानडुकरे जोमात, शेतकरी कोमात !
 

भाजीपाला विक्रेत्यांना धास्ती
कोरोना महामारीमुळे सर्वसाधारण  व्यक्ती जवळ रोजगार राहिला नाही, कंपनीमधून कामगार कमी करण्यात आले. असे काही कामगार भाजीपाला व्यवसाय करीत आहेत.  दैनंदिन व आठवडी बाजाराची जागा नगरपंचायत करून देत नाही. प्रत्येक भाजीविक्रेत्याकडून दररोज नगरपंचायत दैनंदिन पावती द्वारे २०, ३०, ५० रुपये वसूल करीत आहे परंतु यांना नेमके कुठे बसायची सोय करून देत नसल्यामुळे अनेक भाजीपालाविक्रेते धास्तावले आहेत. मटन मार्केट व मच्छी मार्केट मध्ये येणाऱ्यांच्या वाहनांची गर्दी रस्त्यावर असते. या रस्त्यावर नागपूरवरून चारचाकी वाहनाने लोक येत असतात. त्यामुळे दोन चाकी वाहने रस्त्यावर उभी असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नेहमी होते. याकडे नगरपंचायत प्रशासन कानाडोळा करीत आहे.

हेही वाचाः आता खुद्द जनताच विचारतेय, मौदा नगरपंचायत काम करते की राजकारण?
 

 राम मंदिराची ५ एकर जागा बाजारासाठी बनवा....
मौदा येथील आठवडी व दैनंदिन बाजाराची समस्या उद्भवत आहे. रस्त्यावर भाजी विक्रेते बसतात त्यांची योग्य सोय करून देणे नगरपंचायत प्रशासनाचे काम आहे. राममंदिरची ५ एकर जागा लेवल करून भाडे तत्वावर नगरपंचायतने घ्यावी व तेथे बाजार सुरु करावा.
शिवराज बाबा गुजर
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस.

 शासनाच्या निर्णयाप्रमाणे नगरपंचायत प्रशासनाचे कार्य
 नगरपंचायतचे कर्मचारी शुक्रवार बाजार बंद करण्याकरिता बाजारात जात होते परंतु भाजीविक्रेत्यांचा सहयोग मिळत नव्हता. शासनाच्या निर्णयाप्रमाणे नगरपंचायत प्रशासन काम करीत आहे. पोलिस बंदोबस्त बोलवायचा असल्यास फी भरावी लागते. आणि ही परीस्थिती नगरपंचायतची आता नाही.
भारती राजकुमार सोमनाथे
नगराध्यक्ष, नगर पंचायत मौदा.

आठवडी व दैनंदिन बाजार पूर्ववत जागेवरच भरणार
सोमवारपासून दैनंदिन पावती घेणे सुरू आहे. भाजी विक्रेत्यांना दोन दिवस दवंडी देऊन सांगण्यात येणार आहे की रस्त्यावर भरत असलेला बाजार गुजर वाडा पाण्याची टाकी येथे शुक्रवारपासून भरेल. ही जागा बाजारासाठी मोकळी आहे. येथे वाहनांची वर्दळ राहत नाही.
गणेश पात्रे
बाजार प्रमुख नगरपंचायत मौदा.

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Market brought to the streets, folks! Now tell me what to do?