नागपूरचे महापौर का म्हणाले मीसुद्धा संपावर बसेन...जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

राष्ट्रीय सणांच्या दिवशी विशेषत: एक मे कामगार दिनाच्याही दिवशी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यात आल्याने कंपनीवर कारवाई करण्याचेही निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले. 

नागपूर : ए. जी. एन्व्हायरो कंपनीद्वारे शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील कचरा संकलित केला जातो. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पगार कपात, आठवडी सुटी, कामाच्या तासांची निश्‍चिती, पूर्वसूचना न देता कामावरून कमी करणे या कारणावरून संप पुकराला होता. त्यामुळे नागरिकांची ओरड सुरू होती.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

ए. जी. एन्व्हायरो कंपनीच्या सफाई कर्मचारी व कचरा गाड्यांच्या चालकांच्या शिष्टमंडळाने महापौरांना निवेदन दिले होते. यावर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत आज बैठक घेण्यात आली. यात सर्व समस्यांवर गांभीर्याने दखल घेत दर महिन्याला सात ते दहा तारखेच्या आत नियमितरीत्या वेतन व्हावे. भविष्य निर्वाह निधी संबंधात सर्व कागदपत्रे मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे सादर करावे, असे निर्देश यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिले. राष्ट्रीय सणांच्या दिवशी विशेषत: एक मे कामगार दिनाच्याही दिवशी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यात आल्याने कंपनीवर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!  

येत्या सात दिवसांत कंपनी प्रमुखांनी स्वत: उपस्थित राहून उपरोक्त निर्देशावर कार्यवाही करण्याचेही महापौरांनी बजावले. बैठकीला उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विधी समिती सभापती डॉ. धर्मपाल मेश्राम, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांच्यासह ए. जी. एन्व्हायरो कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचारी नेते मुकेश शाहू आदी उपस्थित होते. 

सात दिवसांच्या आता तुमच्या सर्व मागण्या मान्य करून दिल्या जाईल. नाही झाल्यातर तुमच्यासोबत मीसुद्धा संपावर बसेन, असे ठोस आश्‍वासन दिल्यानंतर सफाई कर्मचारी आणि कचरा गाड्यांच्या चालकांनी आपला संप आज मागे घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mayor said, I will also go on strike