
जिल्हाधिकाऱ्यांनीही दारूचे दुकान सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून केवळ पार्सल देण्याचे निर्देश असल्याचे सांगितले. महापौरांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिका आयुक्तांनी सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहे. त्यामध्ये दारू दुकानांचाही समावेश आहे.
नागपूर : गांधीबाग झोनमध्ये इतवारी भागात बंददरम्यान फिरताना दारूचे दुकाने सुरू असल्याच्या मोबाईलवरून माहित होताच महापौर दयाशंकर तिवारी यांनी आश्चर्यासोबतच संताप व्यक्त केला. त्यांंनी तत्काळ जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना फोन करून विचारणा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दारू दुकान सुरू ठेवण्याची परवानगी असल्याचे सांगितल्यानंतर महापौरांनी प्रशासनात समन्वय नसल्याचा आरोप केला.
महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांंनी शनिवार, रविवार सर्व दुकाने, बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार आज शहरातील बाजारपेठ बंद होत्या. महापौर दयाशंकर तिवारी यांनीही सकाळी इतवारी, गोकुळपेठ मार्केटमध्ये फिरून दुकाने बंद करण्याचे तसेच मास्क वापरण्याचे आवाहन केले. इतवारी भागात फिरत असताना त्यांच्या मोबाईलवर कुणीतरी त्यांच्याच प्रभागातील गांजाखेत भागात दारूचे दुकान सुरू असल्याची माहिती दिली.
अधिक वाचा - संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा?, तर विदर्भातील आमदाराला मिळणार वनखाते?
जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व दुकाने बंदचे आदेश असताना दारूचे दुकान कसे सुरू? दारू जीवनावश्यक वस्तूमध्ये नसतानाही दुकान का सुरू केले? याबाबतची त्यांंनी माहिती घेतली असता जिल्हाधिकाऱ्यांचे दारू दुकान बंद न करण्याचे आदेश असल्याचे त्यांना समजले. त्यांंनी तत्काळ जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना फोनवर विचारणा केली.
जिल्हाधिकाऱ्यांनीही दारूचे दुकान सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून केवळ पार्सल देण्याचे निर्देश असल्याचे सांगितले. महापौरांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिका आयुक्तांनी सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहे. त्यामध्ये दारू दुकानांचाही समावेश आहे. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्यामुळे प्रशासनाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे महापौर म्हणाले.
जाणून घ्या - संजय राठोडांचे नाव घेताच ऊर्जामंत्री सभागृहातून ताडकन उठून पडले बाहेर
उद्या दारूची दुकाने बंद?
एकीकडे आयुक्तांनी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले असून त्यात दारूच्या दुकानांचाही समावेश आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी दारू दुकाने सुरू ठेवत असल्याने प्रशासनात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. बंदमध्ये दारूची दुकानेही बंद हवी. आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय साधून रविवारी दारू दुकाने बंद करावे, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली. त्यामुळे उद्या, शहरातील दारूची दुकाने बंद राहणार की सुरू? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.