दरकरारातून मेडिकल, मेयोत चढ्या भावाने दूध खरेदी; वर्षाला एक कोटींचा फटका

Medical and Mayo buy milk high rate
Medical and Mayo buy milk high rate

नागपूर : मेयो, मेडिकलसाठी स्थानिक प्रशासनाच्या पुढाकाराने एका एजन्सीकडून ‘आरे’ कंपनीचे ४२ रुपये लीटर या भावाने दूध पुरवठा होत होता. मात्र, सरकारने दरकरार केला असून, एका लीटरसाठी ५२ रुपये मोजण्यात येत आहेत. स्वस्त दर असलेल्या संस्थेकडून खरेदी करण्यात यावे या सरकारच्या निकषाला या दरकराराने हरताळ फासला आहे.

विशेष असे की, राज्यभरात १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पुरवठ्यासाठी हा दर ठरवण्यात आला. दर दिवसाला १८ रुग्णालयात सुमारे अडीच हजार लीटर दुधाची मागणी असते. दर दिवसाला २५ हजाराचा भुर्दंड शासनावर पडत आहे. वर्षाला एक कोटींचा फटका शासनाला केवळ दूध पुरवठ्यांतून बसणार आहे. इतर वस्तूंच्या बाबतीही हीच स्थिती असण्याची दाट शक्यता आहे.

मेयो आणि मेडिकलमध्ये स्थानिक विक्रेत्याकडून तीन ते चार वर्षांपासून ४२ रुपये लीटर या भावाने दूध पुरवठा होत आहे. मात्र, अचानक त्याला डावलण्यात आले. दरकरार तयार झाले असे सांगत मेयो रुग्णालयातील कंत्राट रद्द करण्यात आले. येथे ४२ रुपये लीटर ऐवजी ५२ रुपये लीटरप्रमाणे दूध खरेदी करण्यात येत आहे. हीच स्थिती आता मेडिकलमध्येही निर्माण होत आहे.

मेडिकलमध्ये दर दिवसाला मागणीनुसार सुमारे दोनशे लीटर दुधाची गरज पडते. तर मेयो रुग्णालयात शंभर लीटरची गरज आहे. राज्यातील मुंबई, पुणे येथेही दोनशे ते तीनशे लीटर दुधाची दर दिवसाला आवश्यकता असते. उर्वरित मेडिकल कॉलेजमध्ये शंभप लीटरची गरज आहे. अशाप्रकारे राज्यात अडीच हजार लीटरची मागणी आहे.

शासनाने हा दरकरार लागू करीत असताना दुधाच्या या भावाकडे मुद्यामपणे दुर्लक्ष केले असल्याच आरोप लोकाधिकार समितीचे चंद्रहास राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दरकरारानुसार दूध खरेदी करण्यात येत आहे असे सांगत जुन्या कंत्राटदाराची सर्व देणी अदा करण्यात येत असल्याचेही सांगितले.

दरकरार रद्द करण्यात यावा
मेडिकल, मेयोला स्वस्त दरात ४२ रुपये लीटरप्रमाणे दूध पुरवठा होत असताना दरकरारानुसार ५२ रुपये प्रति लीटर दराने दूध खरेदीची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे शासनावर वर्षाला एक कोटीचा भुर्दंड बसत आहे. एका लीटरवर १० रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे. प्रशासनाकडून होत असलेली ही लुटच आहे. हा दरकरार रद्द करण्यात यावा. या प्रकरणाची तक्रार करण्यात येईल.
- चंद्रहास राऊत,
लोकाधिकार समिती, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com