सिवनी येथे पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के; नागपूरपासून ९६ किमी अंतरावर केंद्र

नरेंद्र चोरे
Tuesday, 27 October 2020

भूकंप झाला तेव्हा परिसरातील नागरिक गाढ झोपेत होते. त्यामुळे बहुतांश जणांना धक्के जाणवले नाही. सकाळी झोपेतून उठल्यानंतर भूकंप झाल्याची वार्ता पसरताच चर्चेला उधाण आले. नागपूर हे सिवनीपासून दूर असल्यामुळे शहरात धक्के जाणवले नाही.

नागपूर : नागपूरपासून ९६ किमी अंतरावर असलेल्या मध्यप्रदेशातील सिवनी येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ३.३ अशी नोंद झालेल्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ट्विटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, भूकंप पहाटे चार वाजून १० मिनिटांनी झाला. या भूकंपाचे केंद्र नागपूरच्या उत्तर-ईशान्य दिशेला मध्यप्रदेशातील सिवनी येथे होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदविण्यात आली. जो सौम्य प्रकारात मोडतो. त्यामुळे कसलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

अधिक माहितीसाठी - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

भूकंप झाला तेव्हा परिसरातील नागरिक गाढ झोपेत होते. त्यामुळे बहुतांश जणांना धक्के जाणवले नाही. सकाळी झोपेतून उठल्यानंतर भूकंप झाल्याची वार्ता पसरताच चर्चेला उधाण आले. नागपूर हे सिवनीपासून दूर असल्यामुळे शहरात धक्के जाणवले नाही. मात्र, महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना भूकंपाचा थोडाफार धक्का बसला असण्याची शक्यता, प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

मॉन्सूनचा विदर्भाला रामराम

गतवर्षीप्रमाणे यंदाही जोरात बरसलेल्या मॉन्सूनने सोमवारी विदर्भाला रामराम ठोकला. मॉन्सूनने विदर्भातून माघार घेतल्याची अधिकृत घोषणा प्रादेशिक हवामान विभागाने केली. गेल्या दशकातील विचार केल्यास यंदा प्रथमच मॉन्सूनची विदर्भातून उशिरा एक्सहिट झाली आहे. यापूर्वी २०१० मध्ये २८ ऑक्टोबर रोजी मॉन्सून विदर्भातून माघारी परतला होता. गतवर्षी १५ ऑक्टोबरलाच मॉन्सूनने निरोप घेतला होता.

महत्त्वाची बातमी - ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजण्याचे संकेत, जिल्हा परिषदेच्या दोन सर्कलमध्येही पोटनिवडणूक

यावर्षी १२ जूनला मॉन्सूनचे विदर्भात आगमन झाले होते. १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांत ८५२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, जो सरासरी पावसाच्या (९४३ मिलिमीटर) केवळ दहा टक्के कमी आहे. हवामान विभागाच्या भाषेत हा सरासरी पाऊस मानला जातो. यंदा विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद वाशीम जिल्ह्यात झाली. तर सर्वात कमी पाऊस अकोला, यवतमाळ, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये बरसला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mild tremors at Shivni in the morning