esakal | प्रसूतीपूर्वी पॉझिटिव्ह आल्यास घाबरू नका, काय सांगतात नवजात बाळाविषयी तज्ज्ञ डाॅक्टर
sakal

बोलून बातमी शोधा

Minimal risk of covid to new born baby: Dr. Anuradha Ridhorkar

महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविड संवाद’मध्ये मंगळवारी डॉ. अनुराधा रिधोरकर आणि प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. वाय. एस. देशपांडे यांनी ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला.

प्रसूतीपूर्वी पॉझिटिव्ह आल्यास घाबरू नका, काय सांगतात नवजात बाळाविषयी तज्ज्ञ डाॅक्टर

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर  : कोरोनामध्ये गरोदर महिलांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य आहार, व्यायाम यासोबतच मास्क, स्वच्छता आणि फिजिकल डिस्टसिंग हे सर्व कटाक्षाने पाळावे. प्रसूतीपूर्वी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास घाबरण्याची गरज नाही, असा सल्ला प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा रिधोरकर यांनी गर्भवती महिलांना दिला. योग्य सुरक्षेसह प्रसूती केली जात असून मातेने योग्य काळजी घेतल्यास बाळाला कोविड होण्याचा धोका अत्यल्प असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविड संवाद’मध्ये मंगळवारी डॉ. अनुराधा रिधोरकर आणि प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. वाय. एस. देशपांडे यांनी ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. डॉ. अनुराधा रिधोरकर म्हणाल्या, गरोदर मातांकडून बाळाला कोरोना होण्याचा धोका अत्यंत कमी आहे. बाळाला मातेने स्तनपान करणेही बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. स्तनपान करताना आईने मास्क लावणे आवश्यक आहे. कारण कोविड आईच्या दुधातून होत नसला तरी तो बोलताना तोंड आणि नाकातून पडणाऱ्या तुषारांमुळे होऊ शकतो.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..
 

बाधितांवर शस्त्रक्रिया धोकादायक

कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची शस्त्रक्रिया या विषयावर बोलताना डॉ. वाय. एस. देशपांडे म्हणाले यांनी कोरोनाबाधित रुग्णांची शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत धोकादायक आहे. या स्थितीत केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रियाच केल्या जातात. उशिरा करता येऊ शकणाऱ्या शस्त्रक्रिया शक्यतो टाळल्या जातात. 
 

बाधित महिलेची मनपा रुग्णालयात प्रसूती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांमध्ये गरोदर मातांच्या प्रसूतीची मोठी समस्या निर्माण झाली. केवळ मेयो व मेडिकलमध्येच प्रसूतीची सुविधा उपलब्ध होती. आता महानगरपालिकेने पाचपावली सूतिकागृहात कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलांच्या प्रसूतीची व्यवस्था केली आहे. मंगळवारी येथे बाधित गर्भवती महिलेची प्रसूती करण्यात आली असून आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. महापौर संदीप जोशी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पाचपावली सूतिकागृहात बाधित गर्भवती महिलांसाठी प्रसूतीची सुविधा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रसूतीची व्यवस्था मेडिकल अथवा मेयोशिवाय कुठेही नसल्यामुळे कोरोनाबाधित गरोदर मातांची फरफट होत असल्याने त्यांनी मनपाच्या रुग्णालयात व्यवस्था करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. महापौर आणि आयुक्तांच्या प्रयत्नांना पाचपावली प्रसूतिगृहातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. संगीता खंडाईत (बालकोटे) आणि डॉ. वैशाली मोहकर यांनी बळ दिले. लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांची प्रसूती करण्याची व्यवस्था केली. 
 
संपादन : अतुल मांगे