कृषिमंत्री म्हणतात, शेतकऱ्यांचा सन्मान हा कामाचाच भाग

विनोद इंगोले 
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

शेतकरी कार्यालयात गेल्यानंतर त्यांची अनेकदा हेळसांड होते, अशाच तक्रारी आणि अनुभव आहेत. त्यामुळे कार्यालयात गेल्यावर त्यांना पाणी विचारणे, त्यांच्या कामाची आस्थेवाईकपणे माहिती घेणे आणि ते काम कोणत्या अधिकाऱ्याकडे होईल हे शेतकरी मार्गदर्शन व सन्मान कक्षाच्या माध्यमातून प्रभावीपणे होणार आहे.

नागपूर : शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष हा कृषी विभागाच्या दैनंदिन कामाचाच भाग आहे. त्यामुळे अपुऱ्या कर्मचारी संख्येचा हवाला देत या जबाबदारीपासून कोणालाही दूर जाता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कृषिमंत्री दादा भुसे यांनी मांडली. नागपूर दौऱ्यावर असलेल्या दादा भुसे यांनी "सकाळ'शी संवाद साधताना ही माहिती दिली. 

विदर्भात कृषी विभागात रिक्‍त पदांची संख्या मोठी आहे. त्यातच शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष प्रत्येक तालुका, उपविभागीय कृषी अधिकारी स्तरावर स्थापन करून तेथे एका कर्मचाऱ्याच्या नियुक्‍तीचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भाने विचारणा केली असता दादा भुसे यांनी कृषी विभागाच्या कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना हे कार्यालय आपले वाटले पाहिजे.

जाणून घ्या - बोंबला, भागवतासाठी आला अन् बायको घेऊन पळाला

शेतकरी कार्यालयात गेल्यानंतर त्यांची अनेकदा हेळसांड होते, अशाच तक्रारी आणि अनुभव आहेत. त्यामुळे कार्यालयात गेल्यावर त्यांना पाणी विचारणे, त्यांच्या कामाची आस्थेवाईकपणे माहिती घेणे आणि ते काम कोणत्या अधिकाऱ्याकडे होईल हे शेतकरी मार्गदर्शन व सन्मान कक्षाच्या माध्यमातून प्रभावीपणे होणार आहे. हा नियमित कामाचा भाग असणार असल्याने त्याचे ओझे कृषी अधिकाऱ्यांना का वाटावे? असा प्रश्‍न केला. शेतकरी आत्महत्या चिंतेची आणि दुर्दैवी बाब आहे. त्यावर संवाद हा प्रभावी उपाय ठरणार आहे. गावात संवाद हरविला असून कृषी विभागाच्या माध्यमातून संवादावर भर दिला जाईल.

कागदांसाठी त्रास नको

योजनांच्या अंमलबजावणीसाठी ऑनलाइन प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर योजनांसाठी वारंवार दस्तऐवज मागून शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडण्याचे प्रकार थांबतील, असा विश्‍वास दादा भुसे यांनी व्यक्‍त केला. 

व्यापक फेरबदल लवकरच 
विदर्भ व मराठवाड्यात नवनियुक्‍त अधिकाऱ्यांना सेवा सक्‍तीची आहे. परंतु, या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे रिक्‍तपदांचा अनुशेष या भागात वाढला. कृषी विभागात मात्र असे होणार नाही. येत्या दिवसांत तालुका कृषी अधिकाऱ्यांची विदर्भ, मराठवाड्यातील रिक्त पदे भरली जातील. कृषी विभागाचे नूतनीकरणाची प्रक्रिया हाती घेतली जाणार असून व्यापक फेरबदल लवकरच अनुभवाल. 
- दादा भुसे,
कृषिमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Minister of Agriculture says, the respect of the farmers is part of the work