खातेबदलामध्ये पत्ता कट होण्याची नितीन राऊतांना भीती, राहुल गांधींची भेट घेत बाजू बळकट करण्याचा प्रयत्न?

minister dr nitin raut meet congress leader rahul gandhi delhi nagpur news
minister dr nitin raut meet congress leader rahul gandhi delhi nagpur news

नागपूर : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुटल चर्चा सुरू झाली आहे. पदोन्नतीपासून तर गच्छंतीपर्यंत वेगवेगळा सूर त्यांचे समर्थक व विरोधक आवळत आहेत. या संदर्भात संपर्क साधला असताना राऊत यांनी प्रतिसाद दिला नाही.

नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. ते बाहेर पडताच नितीन राऊत आत शिरले. अनुसूचित जाती जमाती विभागाची बैठक असल्याने ते दिल्लीतच होते. सुरुवातीला मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते गेले होते असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. मात्र, त्यांनी आधीच पत्रिका दिल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे राऊत यांच्या भेटीमागचे गूढ चांगलेच वाढले आहे. 

राऊत ऊर्जामंत्री आहेत. त्यांनी सुरुवातीला शंभर युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कोरोना काळात वाढीव बिलात सुधारणा करण्यात येईल, असेही आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात आघाडी सरकारने त्यांची घोषणा व मागणी फेटाळून लावली. त्यामुळे राऊत यांच्याबाबत रोष निर्माण झाला आहे. परस्पर घोषणा करून राऊत आघाडीला अडचणीत आणत असल्याच्या तक्रारी दिल्लीपर्यंत पोहचत्या केल्या आहेत. याची दखल काँग्रेसने कितपत घेतली हे कळायला मार्ग नाही. मात्र, नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळे मंत्रिमंडळात खातेबदल होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. नाना पटोले यांच्या जागी कोणाला नेमायचे हासुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. खातेबदलात आपला पत्ता कट होऊ नये याकरिता राऊत आधीच आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राहुल गांधी यांची भेट घेऊन ते आपण गांधी कुटुंबीयांच्या निकट आहोत, हे दर्शविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांचे पक्षांतर्गत विरोधकांचे म्हणणे आहे. 

घरूनच धक्के - 
नितीन राऊत नागपूरचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. वर्षभराचा कालावधी उलटूनही ते अद्याप जिल्ह्यावर आपली छाप पाडू शकले नाहीत. ऊर्जाखाते आणि जिल्हा नियोजन समितीची बैठक याव्यतिरिक्त ते फारसे इतर कार्यक्रमांमध्ये फिरकत नाही. ऊर्जाखाते कायम ठेऊन त्यांचे पालकमंत्रीपद काढून घ्यावे यासाठी काँग्रेसचा एक गट सक्रिय झाला आहे. घरातूनच धक्के बसत असल्याने राहुल गांधी यांचे भेट घेऊन त्यांनी आपली बाजू सावरल्याचीही चर्चा आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com